पालांदूर : तीन वर्षापूर्वी मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेअंतर्गत तयार झालेल्या किटाडी- मांगली, पेंढरी या ११ किलोमीटर रस्त्याची ओव्हरलोड वाहतुकीने अक्षरशः चाळण झालेली आहे. या परिसरातील आठ ग्रामपंचायतच्या सरपंचांनी बांधकाम विभागाला निवेदन देत रस्ता दुरुस्तीची मागणी केलेली होती. परंतुु काहीही एक फायदा झाला नाही. अखेर पालकमंत्र्यांच्याा जनत दरबारात या विषयाचे निवेदन देण्यात आले.
पालांदूर परिसरात नेरला उपसा सिंचन कालव्यावर बांधकाम सुरू आहे. या कालव्यावर लागणारे खनिज साहित्य आणण्याकरिता मोठ्या टिप्परची मदत घेतली आहे. ओव्हरलोड टिप्पर भरधाव धावत आहेत. त्यामुळे रस्त्याची पूर्णतः चाळण झालेली आहे. यामुळे जनतेला प्रवास करताना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागतो. तीन वर्षांपूर्वी मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेअंतर्गत या रस्त्यावर दोन कंपन्यांच्या माध्यमातून काम करण्यात आले. या ११ किलोमीटर रस्त्यावर नागपूर येथील एका कंपनीने सहा किलोमीटर तर तुमसर येथील एका कंपनीने पाच किलोमीटर रस्त्याचे बांधकाम केले. सदर रस्ता बांधकामानंतर देखभाल दुरुस्तीचे काम सुद्धा त्याच कंपनीने सांभाळायचे होते. मात्र त्यांनी जनतेच्या अपेक्षेला वाटाण्याच्या अक्षदा दाखवीत रस्त्याकडे अक्षम्य दुर्लक्ष केलेले आहे.
मांगली ते पेंढरी हा सहा किलोमीटरचा रस्ता अक्षरशः फुटलेला आहे. किटाडी ते पेंढरी हा अकरा किलोमीटरचा रस्ता तर खड्ड्यात आहे. बांधकाम विभागाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे नेरला उपसा सिंचन कालव्यावर काम करणाऱ्या खासगी कंपन्यांच्या व बांधकाम विभागातील अधिकाऱ्यांच्या निष्काळजीपणामुळे सदर रस्ता प्रवाशांच्या जीवावर उठलेला आहे. पालकमंत्र्यांनी समस्येचे स्वरूप लक्षात घेऊन दखल घ्यावी. बांधकाम विभागाने वेळीच दखल घेत दुरूस्ती करावी अशी मागणी मांगलीचे सरपंच प्रदीप मासुरकर, उद्धव मासुरकर यांनी केली आहे.