भंडारा : पवनी तालुक्यातील कोंढा जिल्हा परिषद क्षेत्र सर्वसाधारण उमेदवारासाठी राखीव असल्याने या क्षेत्रात चौरंगी लढत होण्याची शक्यता आहे. सध्या तरी काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, भाजप व शिवसेना या चार पक्षांच्या उमेदवारांमध्ये ही लढत होणार आहे.
सर्व राजकीय पक्ष स्वतंत्रपणे जिल्हा परिषद निवडणूक लढवत आहेत. यामुळे सर्व पक्षाचे कार्यकर्ते कामाला लागले आहे. या क्षेत्रात काँग्रेस पक्षातर्फे गंगाधरराव जिभकाटे, राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे चेतक डोंगरे, शिवसेनेतर्फे आशिष माटे आणि भाजपातर्फे धनंजय मुंडले हे चार उमेदवार उभे राहणार हे निश्चित झाले आहे. पंचायत समिती कोंढा व आकोट गणात जिल्हा परिषद क्षेत्राच्या उमेदवाराला मिळणारा जोडीदार हा महत्त्वाचा ठरणार आहे.
निवडणुकीच्या प्रचाराला सुरुवात झाली आहे. उमेदवारांनी मतदारांच्या भेटी घेण्याला प्राधान्य दिले आहे. आपल्या क्षेत्रात मोठ्या नेत्यांच्या सभा लावण्याच्या तयारीलादेखील उमेदवार लागले आहेत. गावागावात या क्षेत्रात राजकीय वातावरण तापले आहे. कोण उमेदवार सरस होईल हे सध्या चर्चा करण्याचे माध्यम ठरले आहे. गावातील पानटपरीवर निवडणुकीची चर्चा सुरू आहे. सर्व उमेदवार शक्तीनिशी निवडणुकीत उतरण्याची शक्यता आहे.
गत निवडणुकीत काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यात तुल्यबळ लढत होऊन राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवाराचा विजय झाला होता. भाजप आणि शिवसेनेचे उमेदवार मागे पडले होते. तर, यावेळेस लढतीचे चित्र चौरंगी असण्याची चिन्हे दिसत आहे. काँग्रेसचे उमेदवार गंगाधरराव जिभकाटे कोंढा, भाजपचे उमेदवार धनंजय मुंडले कोसरा, शिवसेनेचे उमेदवार आशिष माटे गोसे, तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार चेतक डोंगरे गोसे गावचे रहिवासी आहेत. यामुळे उमेदवारांना गावातील मतदारांच्या फायदा मिळेल काय हे निवडणुकीनंतरच दिसून येईल.
निवडणुकीसाठी कार्यकर्ते सज्ज झाले आहेत. चौरंगी लढतीत कोणाला फायदा मिळणार आहे, हे निवडणुकीच्या निकालानंतर स्पष्ट होईल. पण सध्या तरी वातावरण तापले आहे. पंचायत समितीचे उमेदवार बदलवत आहेत. तिकीट मिळालेल्या उमेदवारांना वेळेवर समीकरण पाहून बदलवत आहेत. सध्यातरी लढत तुल्यबळ दिसत आहे. सर्वांनी स्वबळाची भाषा वापरली असल्याने कुणाचीही आघाडी नाही या निवडणुकीची रणधुमाळी सर्वत्र दिसणार आहे. यामध्ये काही अपक्षदेखील उभे राहण्याची शक्यता आहे.
या क्षेत्रात दरवेळेस तगडी झुंज दिसून येत असते. कोंढा जिल्हा परिषद क्षेत्राला अजूनपर्यंत जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद मिळाले नाही. तेव्हा ते मिळावे अशीदेखील मतदारांची अपेक्षा आहे. चौरंगी लढतीत कोण बाजी मारणार? हे येणारा काळच ठरणार आहे.