तुमसर तालुक्यात खरीप हंगामातील धानपिकाची लागवडीसाठी शेतकरी लगबग करीत आहे. कृषिपंपधारक शेतकऱ्यांकडे वीजबिल थकीत आहे, अशा शेतकऱ्यांचे कृषिपंपाचे वीज खंडित करणे वीज वितरण कंपनीने सुरू केले आहे. ऐन हंगामात वीज वितरण कंपनीने वीज खंडित करण्याचा सपाटा सुरू केल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. सिंचनाची सोय असलेल्या शेतकऱ्यांनी धनाची पेरणी सुरू केली आहे. त्यामुळे शेतीला सध्या पाण्याची गरज आहे. अशावेळी पंपाचे वीज खंडित झाल्यामुळे पेरणीला पाणी कुठून द्यावे? असा प्रश्न निर्माण झाला आहे. सध्या शेतकऱ्यांच्या हातात पैसा नाही आहे तो धान पेरणी रोवणी व अन्य खर्चासाठी त्यांनी बचत करून ठेवला आहे. कृषिपंपाचे वीजबिल भरले तर त्यांच्याकडे पैसा शिल्लक राहत नाही. त्यामुळे त्यांच्यासमोर मोठे संकट निर्माण झाले आहे. वीज वितरण कंपनी शासनाचे निर्देश आहेत त्या निर्देशानुसार आज कारवाई केली जात असल्याचे सांगत आहे. वीज वितरण कंपनीच्या कारवाईमुळे शेतकऱ्यांनी धास्ती घेतली आहे. अधिकाऱ्यांना विनंती केल्यानंतरही कारवाई केली जात आहे. याकडे लोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष दिसत आहे. शेती कशी करावी? असा प्रश्न शेतकऱ्यांपुढे निर्माण झाला आहे.
बॉक्स
धानाचे बोनसही मिळाले नाही
शेतकऱ्यांनी आधार भूशास्त्रीय धान्य खरेदी केंद्रावर धान विकल्यानंतरही अजूनपर्यंत शासनाच्या घोषणेनुसार धानाला बोनस मिळाला नाही. शेतकऱ्यांच्या हातामध्ये सध्या पैसा नाही. त्यामुळे शासनाने धानाला बोनस तत्काळ द्यावे, अशी मागणीही शेतकऱ्यांनी केली आहे. खरीप हंगामाची सुरुवात झाली असून, शेतकऱ्यांना धान लागवडीकरिता पैशाची गरज आहे.
कोट
कृषिपंपाचे वीजबिल भरले तर त्यांच्याकडे पैसे शिल्लक राहणार नाही. त्यामुळे अनेकांची शेती ही पडीक राहण्याची भीती आहे. शासनाने वीज वितरण कंपनीला कृषिपंपाचे वीज खंडित करू नये, असे आदेश द्यावे, अन्यथा शेतकऱ्यांसोबत रस्त्यावर उतरून विरोध करण्यात येईल.
शंकर राऊत, अध्यक्ष, तुमसर तालुका काँग्रेस कमिटी
कोट
ज्या शेतकऱ्यांकडे कृषिपंपाचे वीजबिल थकीत आहे, त्या शेतकऱ्यांची वीज खंडित करण्याच्या स्पष्ट सूचना शासनाकडून प्राप्त झाले आहेत. त्यानुसार थकित देयक असलेल्या शेतकऱ्यांच्या कृषिपंपाची वीज खंडित केल्या जात आहे.
रूपेश अवचट, उपकार्यकारी अभियंता, वीज वितरण कंपनी, तुमसर