दयाल भाेवतेलोकमत न्यूज नेटवर्कलाखांदूर : भीक मागून कुटुंबासह उदरनिर्वाह करताे. राहते घर नाही, ताडपत्रीच्या झाेपडीत कसेबसे राहताे. जमिनीचा पट्टा नाही म्हणून घरकुल मिळत नाही. घरकुल तेवढ द्या साहेब जिंदगीभर नाव राहील तुमचं अशी आर्त विनवणी नाथजाेगी समाजातील महिला जिल्हाधिकाऱ्यांना करीत हाेत्या. संवेदनशील जिल्हाधिकाऱ्यांनी त्यांच्या सर्व समस्या ऐकून घेतल्या. लाखांदूर तालुक्यातील काेदामढी येथील नाथजाेगी समाजाच्या बेड्यावर शनिवारी जिल्हाधिकारी संदीप कदम पाेहाेचले. त्यावेळी तेथील महिलांनी समस्यांचा पाढा जिल्हाधिकाऱ्यांपुढे वाचला. लाखांदूर तालुक्यात गत काही वर्षांपासून झाेपडीवजा घरात नाथजाेगी समाजाची कुटुंब राहतात. भीक मागून उदरनिर्वाह करणे, हाताला मिळेल ते मजुरी करणे अशी त्यांची दीनचर्या आहे. त्यांच्याकडे काेणतीही कागदपत्रे नसल्याने शासकीय याेजनांचा लाभ मिळत नाही. ही माहिती जिल्हाधिकारी संदीप कदम यांना हाेताच शनिवारी थेट काेदामढी बेडा गाठला. यावेळी तेथे असलेल्या महिला व पुरुषांनी त्यांच्यापुढे आपल्या समस्या सांगितल्या. अनेकांकडे आधारकार्ड नाही, रेशनकार्डचा पत्ता नाही. संजय गांधी निराधार याेजनेसह श्रावणबाळ याेजनेचा लाभ मिळत नाही, असे सांगितले. यावेळी कार्तिक नामक तरुणाने जात प्रमाणपत्र उपलब्ध झाले असले तरी जात वैधता प्रमाणपत्र मिळत नसल्याचे सांगत हा प्रश्न मार्गी लावण्याची मागणी केली. यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी संपूर्ण काेदामढी गाव फिरून नाथजाेगी कुटुंबाच्या झाेपड्यांची पाहणी केली. यावेळी त्यांच्यासाेबत साकाेलीच्या उपविभागीय अधिकारी मनीषा दांडगे, जिल्हा माहिती अधिकारी रवी गीते, तहसीलदार अखिल भारत मेश्राम, उमेदचे नरेंद्र कडबरैये, आदी कर्मचारी उपस्थित हाेते.
लाेकांचे भविष्य सांगणारेच अंधारात नाथजाेगी समाजाचा परंपरागत व्यवसाय म्हणजे हस्तरेषा पाहून भविष्य सांगणे. वर्षानुवर्षे या गावाहून भटकत नागरिकांचे भविष्य सांगत त्यावर गुजरान करतात. परंतु, आधुनिक काळात त्यांच्या भविष्यावर कुणी विश्वास ठेवायला तयार नाही. त्यामुळे त्यांच्या हाताला काम मिळत नाही. लाेकांचे भविष्य सांगणाऱ्यांचेच भविष्य आता अंधकारमय झाल्याचे दिसत आहे. आता जिल्हाधिकारी या समाजासाठी काय करतात. याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.