भंडारा जिल्ह्यात काेराेना संसर्ग माेठ्या प्रमाणात वाढला आहे. सर्वाधिक रुग्ण भंडारा शहरातील आहेत. या रुग्णांच्या मदतीसाठी आणि शहरात काेराेना संसर्ग हाेऊ नये म्हणून नगर परिषदेने वाॅररूम तयार केली आहे. नगर परिषद इमारतीत असलेल्या या वाॅररूममध्ये नगर रचना सहायक अनिकेत दुर्गावळे, निखिल कांबळे, गणेश मुळे, गणेश चव्हाण हे चार कर्मचारी नियुक्त आहेत. याठिकाणी ते नागरिकांच्या सूचनासाेबतच गृहविलगीकरणात असलेल्या रुग्णांना मार्गदर्शन करतात. पाॅझिटिव्ह रुग्णांच्या संपर्कात आलेल्या लाेकांची यादी तयार केली जाते. पाॅझिटिव्ह रुग्णांची ऑनलाईन पाेर्टलवर माहिती भरली जाते. शहरातील कंटन्मेंट क्षेत्र घाेषित करणे, त्यावर नियंत्रण ठेवणे, शहरात प्रतिबंधात्मक कारवाईसाठी नेमलेल्या पथकाला मार्गदर्शन करणे, एवढेच नाहीतर प्रतिबंधात क्षेत्रात अडकलेल्या नागरिकांना जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा देखील केला जाताे. याठिकाणी २४ तास नागरिकांना मार्गदर्शन करण्यात येत असून, काेराेना चाचणी काेणत्या ठिकाणी आहे याचीही माहिती नागरिकांना दिली जाते.
अनेक पाॅझिटिव्ह रुग्ण देतात खाेटा फाेन नंबर
गृह विलगीकरणात पाठविलेल्या काेराेना पाॅझिटिव्ह रुग्णांची स्थिती काय आहे याची माहिती नगर परिषदेच्या वाॅररूमधून घेतली जाते. त्याची चाचणी करताना त्यांचा फाेन नंबर घेतला जाताे. त्यावर संर्पक साधून मार्गदर्शन केले जाते. मात्र, २० टक्के व्यक्ती चाचणी करताना आपला खाेटा माेबाईल नंबर देत असल्याचे दिसून आले. त्यामुळे हा रुग्ण नेमका कुठे आहे याचा शाेध घेण्यासाठी नगर परिषदेच्या पथकाला त्याने दिलेल्या पत्त्यावर जावे लागते. परंतु, तेथेही याेग्य माहिती मिळत नाही. अनेकजण पाॅझिटिव्ह असतानाही बाहेर फिरताना दिसून येतात. अशा व्यक्तींचा शाेध घेऊन त्यांच्यावर कारवाई केली जाते. अनेकदा पाेलीस ठाण्यात गुन्हाही नाेंदविण्यात येताे. भंडारा शहरात काेराेना संसर्ग माेठ्या प्रमाणात वाढत असताना नागरिक मात्र बिनधास्तपणे फिरताना दिसून येतात. अशा व्यक्तींवरही आता नगर परिषद ठाेस कारवाई करणार आहे.
३५०० रुग्ण हाेम आयसाेलेशनमध्ये
भंडारा शहरात रुग्णांची संख्या माेठ्या प्रमाणात वाढत असून, सद्य:स्थितीत ३५०० रुग्ण गृह विलगीकरणात आहेत. यावर नगर परिषदेच्या वाॅररूमधून नियंत्रण ठेवले जाते. त्यांच्याशी फाेनवरून संपर्क साधला जाताे. तसेच ५२ अंगणवाडी सेविकांच्या माध्यमातून घराेघरी भेटी देऊन त्यांच्या प्रकृतीसाेबतच ते काेराेना नियमांचे पालन करतात की नाही याचीही चाचपणी केली जाते.
शहरातील प्रत्येक प्रभागातील पाॅझिटिव्ह रुग्णांच्या घरी व प्रतिबंधात क्षेत्रात नगरपरिषदेच्या पथकाकडून निर्जंतुकीकरण करण्यात येते. यासाठी नगरपरिषदेने पथक तयार केले आहे. तसेच नगरपरिषदेच्या वतीने भाजीपाला व्यावसायिक व इतर जीवनावश्यक वस्तू विक्रेत्यांना मास्क आणि सॅनिटायझरचे नि:शुल्क वितरण करण्यात येत आहे.
काेराेना संसर्गाची लाट राेखण्यासाठी नगर परिषद सज्ज आहे. विविध पथकांच्या माध्यमातून शहरातील परिस्थितीवर नियंत्रण ठेवले जाते. विनामास्क फिरणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई केली जात आहे. शहरात निर्जंतुकीकरण केले जाते. नागरिकांच्या मदतीसाठी नगरपरिषदेने वाॅररूम स्थापन केली असून, नागरिकांनी काेराेना संसर्ग राेखण्यासाठी सहकार्य करावे.
- विनाेद जाधव, मुख्याधिकारी भंडारा
नियम माेडणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई
ब्रेक द चेन अंतर्गत जिल्ह्यात संचारबंदी लागू आहे. भंडारा शहरात त्याचे काटेकाेरपणे पालन केले जाते की नाही हे पाहण्याची जबाबदारी नगर परिषदेची आहे. पाेलिसांच्या मदतीने नगर परिषद शहराच्या विविध भागात गस्त घालीत असते. नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई केली जाते. नगर परिषदेच्या वाॅररूमला माहिती मिळताच तेथून तत्काळ संबंधित पथकाला याबाबत सूचित केले जाते. त्यानंतर पथक त्याठिकाणी जाऊन कारवाई करते. विनामास्क फिरणाऱ्या नागरिकांसह वेळेनंतर दुकान उघडे ठेवणाऱ्यांवर आतापर्यंत कारवाई करण्यात आली आहे.