गत काही दिवसांपासून जिल्ह्यात कोविड रुग्णांच्या संख्येत लक्षणीय वाढ होत आहे. रुग्णालयात दाखल कोविड रुग्णांची संख्या वाढल्याने पीपीई कीटचाही वापर वाढला आहे. कोविड वॉर्डात रुग्णसेवा देणाऱ्या प्रत्येक आरोग्य कर्मचाऱ्यांसह डॉक्टरांनाही सहा ते सात तास पीपीई कीट परिधान करावी लागत आहेत. त्यामुळे एकदा पीपीई कीट परिधान केल्यावर या कर्मचाऱ्यांना पाणीदेखील पिणे शक्य होत नाही. दुसरीकडे जिल्ह्यातील तापमानात लक्षणीय वाढ झाल्याने उकाडा वाढला आहे. पीपीई कीटचे कापड प्लास्टिकच्या आवरणाने आच्छादलेले असल्याने त्यातून वाराही जात नाही आणि पाणीही जात नाही. त्यामुळे पीपीई कीट परिधान करणाऱ्या कर्मचाऱ्यांना मोठ्या प्रमाणात घाम येणे, घशाला कोरड पडणे, हातापायाला व्रण येणे, चक्कर येणे, युरिन इन्फेक्शन, फंगल इन्फेक्शन, थकवा, आदी समस्यांना समोरे जावे लागत आहे. जिल्ह्यात उन्हाचा पारा ४१ अंश सेल्सिअसवर गेल्याने पीपीई कीट परिधान करणाऱ्या वैद्यकीय कर्मचाऱ्यांच्या समस्येत वाढ झाली आहे.
बॉक्स
आरोग्य कर्मचारी त्रस्त
- कोरोना चाचणी करण्यासाठी आरोग्य कर्मचाऱ्यांना अनेक तास उभे राहावे लागते. सुरक्षेसाठी पीपीई कीट परिधान करणे अनिवार्य आहे. मात्र, या कीटमुळे आरोग्य कर्मचाऱ्यांना मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागतो, कारण या कीटमधून हवा अजिबात शरीरापर्यंत पोहोचत नाही. त्यामुळे सलग एकाच कर्मचाऱ्यांकडे हे काम न देता टप्प्याटप्प्याने देण्यात यावे, अशी मागणी होत आहे.
- शासनाने आरोग्य कर्मचाऱ्यांच्या समस्येकडे लक्ष देऊन समस्या सोडविण्याची गरज निर्माण झाली आहे. जेणेकरून कर्मचाऱ्यांना दिलासा मिळेल.
कोट
पीपीई कीट परिधान केल्यानंतर घाम येणे, घशाला कोरड पडणे यासह चक्कर येणे यासारख्या समस्यांना सामोरे जावे लागते. उन्हाचा पारा वाढल्याने या समस्यांमध्ये वाढ झाली असली, तरी वैद्यकीय कर्मचारी रुग्णसेवेला प्राधान्य देत आहेत. जिल्हा रुग्णालयात दररोज जवळपास १०० पीपीई कीटचा वापर होत आहे.
- डॉ. निखिल डोकरीमारे,
अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक, सामान्य रुग्णालय, भंडारा
२००१७ एकूण बाधित
४३७९ उपचार सुरू
१५२८७ बरे झालेले
३५१ एकुण मृत्यू
३५० पीपीई कीटचा दररोज होतो वापर