सडक अर्जुनी : शासन आणि प्रशासन एकीकडे जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासाच्या गोष्टी करीत असताना दुसरीकडे मात्र जिल्ह्यातच दिव्याखाली अंधार असल्याचे चित्र आहे. तालुक्यातील मुशानझोरवा गावातील नागरिक अद्यापही पायाभूत सुविधांपासून वंचित आहेत. धड रस्ते नाहीत. पायभूत सुविधा नसल्याने येथील गावकऱ्यांना विविध समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. येथील गावकऱ्यांच्या समस्यांची शासन आणि प्रशासनाने दखल घेतली नसल्याने येथील गावकरी साहेब, आम्हाला पायाभूत सुविधा केव्हा मिळणार, असा सवाल करीत आहेत.
‘गाव तिथे रस्ता’, ‘गाव तिथे शाळा’ हा शासनाचा नारा असला तरी यापासून मात्र मुशानझोरवावासीय अद्यापही वंचित आहेत. सडक अर्जुनी पंचायत समिती अंतर्गत खडकी गट ग्रामपंचायतीत येणाऱ्या मुशानझोरवा गावात अद्यापही पक्के रस्ते नाहीत. त्यामुळे पावसाळ्याच्या दिवसात गावकऱ्यांना चिखलातूनच मार्ग काढावा लागतो.
हे गाव जंगलव्याप्त असल्याने पक्क्या रस्त्यांअभावी गावकऱ्यांना तीन कि.मी.चे अंतर चिखलातून पार करावे लागते. या परिसरात नेहमीच वन्यप्राण्यांचा वावर असतो. त्यामुळे गावकऱ्यांना जीव मुठीत धरून पायवाट शोधावी लागते.
या गावात अद्यापही अंगणवाडी केंद्र सुरू करण्यात आले नाही. त्यामुळे चिमुकले अंगणवाडीत जाण्यापासून वंचित आहेत. हे गाव जंगलव्याप्त असल्याने आरोग्य विभागाचे कर्मचारीही या गावाला भेट देत नसल्याने गावकऱ्यांना आरोग्यविषयक सोयीसुविधांपासून दूर राहावे लागत आहे.
गावात पायाभूत सुविधा उपलब्ध करून देण्याबाबत गावकऱ्यांनी अनेकदा पाठपुरावा केला. मात्र, त्याची शासन आणि प्रशासनाने दखल घेतली नाही.
शेती आणि पशुपालनावर उदरनिर्वाह
मुशानझोरवा गावातील नागरिकांचा मुख्य व्यवसाय हा शेतीच असून, शेतीला जोडधंदा म्हणून गावकरी पशुपालन व दुग्ध व्यवसाय करतात. यावरच येथील गावकऱ्यांचा उदरनिर्वाह चालतो. शासनाने येथील गावकऱ्यांना अर्थसाहाय्य उपलब्ध करून दिल्यास गावकऱ्यांचा विकास होऊ शकतो.
पिण्याच्या पाण्याची समस्या मार्गी
मुशानझोरवा येथील पिण्याच्या पाण्याची समस्या अलीकडेच मार्गी लावण्यात आली. सौर ऊर्जेवर चालणारे पंप बसविण्यात आले. त्यामुळे येथील गावकऱ्यांची समस्या मार्गी लागली आहे. मात्र, इतर समस्या कायम आहेत.