डीएमओ येईपर्यंत बसले तहसीलवरच
साकोली : आधारभूत धान खरेदी विर्शी केंद्र सुरू करण्यात यावे या मुख्यमंत्री यांना १२ मार्चला दिलेल्या १७५ शेतकऱ्यांच्या स्वाक्षऱ्यांसह निवेदनावर काहीच कारवाई न झाल्याने पोलिसांकडे १५ मार्चला ट्रॅक्टरवर पोते घेत तहसीलवर आंदोलनाची परवानगी मागितली, पण धारा १४४ असल्याने पोलीस निरीक्षक बोरकर यांनी शांतता व सुव्यवस्थेकरिता तहसीलदार यांकडे न्यायप्रविष्टात पाठविले, पण तहसील कार्यालयात जिथपर्यंत डीएमओ येत नाही तोपर्यंत शेतकऱ्यांनी तहसीलवरच ठिय्या आंदोलन सुरू केले.
सर्व गोदाम भरल्याने केंद्र विर्शी अंतर्गत किन्ही परिसरातील शेतकऱ्यांनी धान खरेदी त्वरित सुरू करण्यासाठी ३ दिवसांपूर्वी निवेदन दिले व १५ मार्चला तहसीलवर ट्रॅक्टर मोर्चाचे आयोजन केले होते, पण धारा १४४ असल्याने पोलीस विभागाने परवानगी नियमानुसार दिली नाही, त्यातच ६० ते ७० शेतकरी थेट तहसील कार्यालयात पोहोचून तहसीलदार यांच्या कक्षातच बसून ठिय्या आंदोलन सुरू केले व जोपर्यंत डीएमओ येथे येत नाहीत तोपर्यंत हे आंदोलन असेच सुरू ठेवण्याचा पवित्रा घेतला. या वेळी शेतकरी घनश्याम पारधीने त्वरित धान्य मोजणी सुरू करा, अन्यथा आत्महत्येची परवानगी द्या, नाहीतर दोन दिवसांत वैनगंगेवरून उडी घेण्याची धमकी दिल्याने प्रशासन हादरले असून त्वरित धान खरेदी केंद्र सुरू करण्यात यावे अन्यथा रस्त्यांवर धान्य पोते टाकून आंदोलन करण्यात येईल, असा संतापजनक इशारा दिला. या आंदोलनात असंख्य शेतकऱ्यांसह घनश्याम पारधी, अनिल टेंभरे, मधुकर कापगते, विजय पटले, अविनाश ब्राह्मणकर, कृउबांस संचालक ॲड. मनीष कापगते, नंदू समरीत, आर. कापगते सरपंच, सुरेश कापगते व ६० ते ७० शेतकरी ठिय्या आंदोलन करीत आहेत.