लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : पावसाळ्यापूर्वी शहरातील नाल्या, गटारे स्वच्छ करुन सांडपाण्याची विल्हेवाट योग्य रीतीने व्हावी यासाठी नगर पालिका प्रशासनच्या वतीने मोहिम राबविण्यात येत आहे. यात शहरातील नाल्या युध्द पातळीवर उपसण्याचे कार्य सुरु असल्याचे दिसून येत आहे. यासाठी पालिका प्रशासनाने सहा लक्ष रुपयांच्या निधीची तरतूद केली आहे. वाढती लोकसंख्या व अतिक्रमण लक्षात घेवून भंडारातील नगर नियोजन जसे हवे तसे नाही. परिणामी शहरातील घनकचरा व्यवस्थापनाबाबदही नगर पालिका प्रशासनाला तारेवरची कसरत दरवर्षी करावी लागते. दीड लक्ष पेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या भंडारा शहरातील नाल्यांची स्थिती चांगली नाही. काही ठिकाणी नाल्या आहेत तर त्यावर आच्छादन नाही. कुठे आच्छादन असले तरी नालीचा उपसा होत नाही. वार्डातील गल्लीबोळीतील नाल्या आजही पुर्णपणे उपसलेल्या नाहीत. परिणामी वॉर्डवासियांना दुर्गंधीचा सामना करावा लागतो. दरवर्षीप्रमाणे यावर्षीही भंडारा पालिकेने मान्सूनच्या तोंडावर नाल्यातील गाळ उपसण्याचे कार्य सुरु केले आहे. स्वच्छता कर्मचारीही यात गुंतले आहेत. निधीची तरतूद करण्यात आली असली तरी शहराचे वाढते स्वरुप लक्षात घेता ही मोहिम पुर्णत्वास जाणार की नेहमीप्रमाणे अर्ध्यावरच डाव मोडणार? शहरातील मुख्य मार्गावरील नाल्यांवर आच्छादने आहेत. काही मार्गावरील नाल्या बऱ्याच वर्षांपासून उपसण्यात आलेल्या नाहीत. पालिका प्रशासनाने गांभीर्याने लक्ष देणे गरजेचे आहे.
मान्सून पूर्वतयारीसाठी सहा लाखांचा निधी
By admin | Published: June 03, 2017 12:19 AM