लाेकमत न्यूज नेटवर्कभंडारा : महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान कार्यक्रम अंतर्गत भंडारा शहरातील पाणीपुरवठा योजना कंत्राटदाराच्या लेटलतीफशाहीने रखडली असून, ही योजना सहा महिन्यांत पूर्ण करण्याचा अल्टिमेटम आमदार नरेंद्र भोंडेकर यांनी दिला. यावेळी त्यांनी अधिकारी कर्मचाऱ्यांची झाडाझडती घेत काम पूर्ण न केल्यास कंत्राटदाराला काळ्या यादीत टाकण्याचे निर्देश दिले. शहरातील पाणीपुरवठा योजनेच्या कामाच्या प्रगतीची पाहणी बुधवारी आमदार नरेंद्र भोंडेकर यांनी केली. यावेळी नगरपरिषद मुख्याधिकारी विनोद जाधव, अभियंता प्रशांत गणवीर, महाराष्ट्र जीवन प्राधिकरणचे कार्यकारी अभियंता तंगटपल्लीवार, कंत्राटदार आर. ए. धुले, शिवसेना जिल्हाप्रमुख अनिल गायधने, शहरप्रमुख सुरेश धुर्वे, व्यापारी आघाडीचे जिल्हाप्रमुख जॅकी रावलानी उपस्थित होते. ही पाणीपुरवठा योजनेला ४ जुलै २०१८ मध्ये प्रशासकीय मंजुरी मिळाली होती. ५७ कोटी २६ लाखांच्या या योजनेचा कार्यारंभ आदेश १८ फेब्रुवारी २०१९ रोजी पालघर मुंबईच्या आर. ए. धुले यांच्या कंपनीला देण्यात आला. १८ महिन्यात म्हणजे १८ ऑगष्ट २०२० रोजी हे काम पूर्ण होणे अपेक्षित होते; मात्र कंत्राटदाराच्या लेटलतीफशाहीमुळे ही योजना रखडली आहे. या योजनेचे ५० टक्केसुद्धा काम पूर्ण झालेले नाही. उलट ऐतिहासिक दसरा मैदानाचे विद्रुपीकरण करण्यात येत आहे. नियोजनशून्य या कामाचा फटका नागरिकांना बसत आहे. पाईपलाईनसाठी रस्ते फोडण्यात आले आहे. या रस्त्यांच्या दुरुस्तीचे काम कंत्राटदाराने करणे अपेक्षित होते, ते सुद्धा करण्यात आले नाही. ठरावीक कालावधीत काम पूर्ण न केल्याने नगरपालिकेतर्फे कंत्राटदाराला ५५ लक्ष रुपये दंड ठोठावण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. आता कंत्राटदाराने येत्या सहा महिन्यांत काम पूर्ण न केल्यास काळ्या यादीत टाकण्याचा इशारा आमदार नरेंद्र भोंडेकर यांनी दिला आहे.
अशी आहे पाणीपुरवठा योजना५७ कोटी २६ लाखांच्या या योजनेत दसरा मैदान येथे १७ लाख लिटरची पाणी टाकी, संताजीनगर येथे २७ लक्ष लिटर पाणी टाकी, हुतात्मा स्मारक ७.५० लाख लिटर, दुसऱ्या टप्प्यात भैयाजीनगर येेथे ७.५० लाख लिटर, म्हाडा कॉलनीत ४.५० लाख लिटर, विद्यानगर येथे १२.५० लाख लिटर पाणी टाकीचे नियोजन आहे. मुख्य पाईपलाईनच्या कामासह १७० मीटर वितरिका असून, ६० किमीचेच काम पूर्ण झाले आहे. वॉटर ट्रिटमेंट प्लॉटचे ६० टक्के काम पूर्ण झाले आहे. दसरा मैदानावरच जलशुध्दिकरण सयंत्र उभारण्यात येत आहे.
भुयारी गटारीचे नियोजनबध्द काम- शहराच्या सौंदर्यात व स्वच्छतेत भर घालणाऱ्या भुयारी गटारी प्रकल्पाला प्रशासकीय मंजुरी मिळाली असून, या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाचे काम नियोजनबद्ध पद्धतीने केले जाईल. पाणी पुरवठा योजनेप्रमाणे भुयारी गटारी प्रकल्पाचे तीनतेरा वाजणार नाही याची पुरेपूर काळजी घेतली जाईल, असे आमदार नरेंद्र भोंडेकर यांनी सांगितले.