आमगाव (भंडारा) : शाळेलगत असलेल्या पाण्याच्या टाकीवरील पोळातील मधमाशांनी केलेल्या हल्ल्यात दोन विद्यार्थिनीसह सहा जण जखमी झाल्याची घटना भंडारा तालुक्यातील डोडमाझरी (टेकेपार) येथे गुरुवारी सकाळी १०.३० वाजताच्या सुमारास घडली. यामुळे गावात भीतीचे वातावरण पसरले असून शाळेला सुटी देण्यात आली आहे.
गुंजन राजू रामटेके (१०), विद्या मुकेश परतेकी (१०) या विद्यार्थिनी आणि अजित इस्तारी नेवारे, विलास रतीराम मेश्राम, अनिल रामटेके, मोहन ठवरे अशी जखमींची नावे आहेत. गुंजन आणि विद्या गावातील जिल्हा परिषद प्राथमिक शाहेत चौथ्या वर्गात शिकतात. गुरूवारी नेहमी प्रमाणे त्या सकाळी १०.३० वाजता शाळेत आल्या. त्यावेळी पाण्याच्या टाकीवर असलेल्या पोळाती मधमाशा उठल्या. काही काळायच्या आता शाळेच्या आवारात असलेल्या या दोन विद्यार्थिनीवर हल्ला केला. त्याच वेळी शाळेसमोरून जाणाऱ्या गावातील चौघांवरही या मधमाशांनी हल्ला केला. यामुळे एकाच गोंधळ उडाला.
शाळेत सर्व विद्यार्थ्यांना वर्ग खोल्यांमध्ये जाण्यास सांगण्यात आले. दुसरीकडे मधमाशांनी हल्ला केल्याचे माहित होताच गावकऱ्यांनी शाळेकडे धाव घेतली. गुंजन आणि विद्या या दोघींना धारगाव आरोग्य केंद्रात उपचारासाठी दाखल करण्यात आले. मधमाशा दिवसभर शाळा परिसरात घोंगावत असल्याने सुरक्षेच्या दृष्टीने गुरूवारी शाळेला सुटी देण्यात आली.