गोपालकृष्ण मांडवकर
भंडारा : २०११-१२ मधील धान खरेदीत साडेबारा कोटी रुपयांच्या अपहार प्रकरणात जिल्ह्यातील सहा राईस मिलचाही समावेश असल्याचे सीआयडीच्या तपासात समोर आले आहे. यामुळे या सहा राईस मिल संशयाच्या भोवऱ्यात सापडल्या आहेत.
आधारभूत खरेदी केंद्रांवरून धान खरेदी केल्याचे कागदोपत्री दाखवून शासनाला तांदूळ परत न दिल्याचे आणि शेतकऱ्यांचे खोटे सातबारा आणि खोटी बिले जोडून अपहार केल्याचे हे प्रकरण आहे. तत्कालीन निलंबित जिल्हा पणन अधिकारी गणेश खर्चे यांनी २०१८ मध्ये याप्रकरणी सीआयडीकडे तक्रार केली होती. त्यानंतर सीआयडीच्या अधिकाऱ्यांनी केलेल्या तपासात हा प्रकार उघड झाला होता. याप्रकरणी २०११ मध्ये कार्यरत असलेले तत्कालीन जिल्हा पणन अधिकारी अशोक शहारे आणि तुमसर येथील कृषक सेवा सहकारी संस्थेचे तत्कालीन संचालक आणि माजी अध्यक्ष धनराज चौधरी (मांढळ) यांना सीआयडीच्या अधिकाऱ्यांनी दोन दिवसांपूर्वी अटक केली होती.
हा घोटाळा एकूण १२.५० कोटी रुपयांचा आहे. तुमसर येथील कृषक सेवा सहकारी संस्थेला २०११-१२ मध्ये आधारभूत धान खरेदी केंद्र मिळाले होते. या केंद्रावरून जवळपास दीड कोटी रुपयांची अफरातफर झाली होती. भरडाईसाठी जिल्ह्यातील ६ राईस मिलकडे धान दिल्याचे कागदोपत्री दाखविण्यात आले होते. भरडाईनंतर तांदूळ शासनाकडे परत न करता खोटी बिले जोडून शेतकऱ्यांच्या नावे रकमेची उचल करण्यात आली होती. प्रकरण उघडकीस आल्यावर काही राईस मिल चालकांनी ८.५० कोटी रुपयाचा धान शासनाकडे जमा केल्याचे तपासात आढळून आले. यात मोहाडी तालुक्यातील सहा राईस मिलचा समावेश आहे. या मिलशी संबंधित असलेले मोहाडी, तुमसर व भंडारा तालुक्यातील अनेक खरेदी केंद्रही अडचणीत येण्याची शक्यता आहे.
रेकाॅर्डमध्ये खाडाखोड
२०१८ मध्ये याप्रकरणी झालेल्या तक्रारीनंतर सीआयडीने केलेल्या तपासात तत्कालीन जिल्हा पणन अधिकारी अशोक शहारे यांचे रेकॉर्ड जप्त केले. त्यात मोठ्या प्रमाणात खाडाखोड आढळून आली. मात्र, चौकशीत याचे स्पष्टीकरण ते देऊ शकले नाही.
धनराज चौधरी रुग्णालयात
अशोक शहारे आणि धनराज चौधरी यांच्या एक दिवसांच्या पोलिस कोठडीनंतर या दोघांनाही १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी मिळाली आहे. दरम्यान, प्रकृतीच्या कारणामुळे धनराज चौधरी रुग्णालयात दाखल असून, अशोक शहारे न्यायालयीन कोठडीत आहेत.