साकोली (भंडारा) : दरोड्याच्या प्रयत्नात असलेल्या सहा दरोडेखोरांना मोठ्या शिताफीने भंडारा स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने मंगळवारी पहाटे तालुक्यातील वलमाझरी फाट्यावर जेरबंद केले. ते गत दोन ते अडीच महिन्यांपासून दरोड्यासाठी रेकी करत असल्याचे पुढे आले. या दरोडेखोरांमध्ये साकोली तालुक्यातील एका डॉक्टर पुत्राचा समावेश असून तोच मास्टरमाईंड असल्याचे सांगण्यात आले.
सुरज राम अवतार जयस्वाल (28) रा. संजयनगर गोविंदपूर, मिलिंद नरेंद्र गजभिये (37) रा. कस्तुरबा वार्ड गोंदिया हल्ली मुक्काम कामठी जि. नागपूर, रामेश्वर ज्ञानीराम वाढई (32) रा. इंदिरा गांधी वार्ड कुंभारटोली भंडारा, अरविंद वामन डोंगरवार (42) रा. घानोड ता. साकोली, कोमल रमेश बनकर (26) रा. छोटा गोंदिया अशी अटकेतील दरोडेखोरांची नावे आहेत.
अरविंद डोंगरवार हा साकोली तालुक्यातील एका प्रतिष्ठित डॉक्टर पुत्र असल्यानेआश्चर्य व्यक्त होत आहे. साकोलीपासून १५ किलोमीटर अंतरावरील एका गावात डॉक्टरच्या घरात मोठा दरोडा पडणार अशी माहिती स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला काही दिवसांपूर्वी मिळाली होती. तेव्हापासून पोलीस त्यांच्या मागावर होते.
सोमवारी सायंकाळी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला नागपूरवरून एक निनावी फोन आला. त्याने रात्री साकोली तालुक्यात दरोडा पडण्याची शक्यता आहे, असे म्हणून आपला फोन बंद केला. त्यानुसार साकोली तालुक्यातील अलर्ट जारी केला. साकोली शहरावर विशेष नजर ठेवली होती. पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला. नागरिकांनाही आवाहन करून घरा बाहेरील लाईट सुरू ठेवा जगत रहा असे म्हणत पोलिसांनी रात्रभर सायरनचा वाजवत गस्त घालत हाेते.
दरम्यान मंगळवारी पहाटे वलमाझरी फाट्यावर सहा व्यक्ती मोटरसायकलवर येताना दिसले. पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले. त्यांच्या जवळून लोखंडी राॅड, चाकू, मिरची पावडर व दोरी जप्त करण्यात आली. जिल्हा पोलीस अधीक्षक वसंत जाधव, अपर पोलीस अधीक्षक अनिकेत भारती यांच्या मार्गदर्शनात ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखेचे प्रमुख जयवंत चव्हाण यांनी केली. पोलीसांच्या सतर्कतेने दरोड्याचा मोठा डाव उधळून लावण्यात आला.