लोकमत न्यूज नेटवर्कसाकोली/सानगडी : स्टेट बँकेच्या इमारतीची खिडकी तोडून लॉकरमधील ३२ लाख रोखेसह सोने चोरणाऱ्याचोरट्यांचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी सहा पथके रवाना केली आहे. श्वानपथकाला पाचारण करून माग काढण्याचा प्रयत्न करण्यात आला. सायंकाळपर्यंत नेमके किती सोने चोरीस गेले याचाही अंदाज आला नव्हता. दरम्यान जिल्हा पोलीस अधीक्षकांसह वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देवून तपासाला गती दिली आहे. साकोली तालुक्यातील सानगडी येथे स्टेट बँकेची शाखा आहे. एका भाड्याच्या इमारतीत ही शाखा कार्यरत आहे. सोमवारी नेहमीप्रमाणे बँकेचा व्यवहार सुरू होता. सायंकाळी व्यवहार पूर्ण झाल्यावर बँक बंद झाली. दरम्यान मध्यरात्रीच्या सुमारास चोरट्यांनी इमारतीच्या मागच्या बाजूची तकलादू लाकडी खिडकीची ग्रील तोडली आणि आत प्रवेश केला. गॅसकटरच्या सहाय्याने लॉकर तोडून आतील रोख ३२ लाख रुपये आणि सोन्याचे दागिने लंपास केले. हा प्रकार मंगळवारी सकाळी बँकेत कर्मचारी आल्यानंतर उघडकीस आला. या घटनेची माहिती साकोली पोलिसांना देण्यात आली. सहायक पोलीस निरीक्षक संजय खोकले पथकासह घटनास्थळी दाखल झाले. पाठोपाठ साकोलीचे उपविभागीय अधिकारी तुकाराम काटे यांनीही सानगडी गाठले. पोलीस अधीक्षक वसंत जाधव आणि अप्पर पोलीस अधीक्षक अनिकेत भारती हेही बँकेत पोहचले. भंडारा येथून श्वानपथकाला पाचारण करण्यात आले. श्वानाने मुख्य रस्त्यापर्यंत माग काढून तेथे घुटमळले. त्यामुळे चोरट्यांचा शोध घेणे शक्य झाले नाही. स्टेट बँकेत रात्रपाळी चौकीदार नसल्याने चोरटे नेमके किती होते, घटना किती वाजता घडली हेही कळायला मार्ग नाही. विशेष म्हणजे बँकेत असलेले सीसीटीव्हीही बंद असल्याने चोरांचा शोध घेणे अवघड झाले आहे.दरम्यान स्थानिक गुन्हे शाखा, सायबर विभागाचे अधिकारीही येथे दाखल झाले. तसेच साकोली, लाखनी आणि पालांदूरच्या पोलीस अधिकाऱ्यांनाही तपासासाठी पाचारण करण्यात आले. पोलिसांची सहा पथके तयार करण्यात आली असून ती चोरट्यांच्या शोधात रवाना झाली आहे.
विर्शी बँकेतही याच पद्धतीने झाली होती चोरी साकोली तालुक्यातील विर्शी येथील बँक ऑफ महाराष्ट्रच्या शाखेत दोन वर्षापुर्वी चोरी झाली होती. त्या चोरीची पद्धत आणि सानगडीत झालेल्या चोरीची पद्धत सारखीच आहे. तेथेही चोरट्यांनी खिडकी तोडून गॅस कटरच्या सहायाने तिजोरी कापून रोख रक्कम लंपास केली होती. या घटनेला आता दोन वर्षापेक्षा अधिक कालावधी झाला असला तरी चोरट्यांचा थांगपत्ता लागला नाही. विशेष म्हणजे विधानसभा निवडणुकीच्या कालावधीत साकोली येथील बँक ऑफ इंडियातही चोरी झाली होती. तब्बल चार कोटी रुपये चोरट्यांनी लंपास केले होते. मात्र या चोरट्यांना जेरबंद करण्यात यश आले.
चोरीतील सोन्याची माहिती मिळविण्याची धडपड सानगडी येथील स्टेट बँकेतील चोरीत चोरट्यांनी नेमके किती सोने चोरून नेले याचा सायंकाळपर्यंतही उलगडा झाला नव्हता. स्टेट बँकेच्या अधिकाऱ्यांच्या मदतीने पोलीस शोध घेत होते. मात्र लॉकरच्या चॅव्या नसल्याने नेमकी किती चोरी झाली हे स्पष्ट होवू शकले नाही. नागपुरवरून पथक आल्यानंतर उशिरा रात्रीपर्यंत चोरीचा नेमका आकडा कळेल, असे सांगण्यात आले. चोरी झाल्याने बँकेतील सर्व कर्मचारी घाबरलेल्या अवस्थेत असून माहिती देताना त्यांची धांदल उडत होती. त्यामुळे पोलिसांना तपासातही अडचणी येत होत्या. पोलीसांचे पथक रात्री उशिरापर्यंत बँकेत तळ ठोकून होते.