आॅनलाईन लोकमतपवनी : स्थानिक स्व.हरिश्चंद्र पाटील सावरबांधे महाविद्यालयात एटीकेटी अंतर्गत बी.कॉम.च्या शेवटच्या वर्षाला असलेले विद्यार्थी बी.कॉम. भाग दोनच्या परीक्षेपासून वंचित राहिले. त्यांचे परीक्षा प्रवेशपत्र तयार करून देण्यासाठी महाविद्यालयाचे संचालक, प्राचार्य व लिपिकांनी असमर्थता दर्शविली. दरम्यान, फसवणूक करण्यात आल्याची तक्रार विद्यार्थ्यांनी पोलिसात केली. त्यावरून पवनी पोलिसांनी संचालक, प्राचार्य व लिपिकाविरूद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे.शनिवार, (दि.३ मार्च) रोजी बी.कॉम. भाग दोनचा पेपर होता. त्यामुळे १ मार्चपासून विद्यार्थी परीक्षा प्रवेशपत्रासाठी महाविद्यालयाच्या संपर्कात होते. परंतु परीक्षेच्या वेळेपर्यंत महाविद्यालय प्रशासनाने विद्यार्थ्यांचे प्रवेशपत्र उपलब्ध करून दिले नाही. त्यामुळे परीक्षेपासून वंचित कोमल वंजारी, करूणा वावरे, सुप्रिया रामटेके, भाग्यश्री धुर्वे, सोहम नखाते, वैशाली आंबोलीकर या विद्यार्थ्यांनी पोलीस ठाणे गाठून तक्रार नोंदविली.कोमल मनोहर वंजारी रा.कन्हाळगाव याच्या तक्रारीवरून संस्थेचे संचालक अमित गायधनी (४०) रा.लाखनी, प्राचार्य घनश्याम धडाले (६०) रा.पवनी व लिपिक निता जुमळे (३५) या तिघांविरूद्ध भादंवि ४०७, ४२०, ३४ कलमान्वये गुन्हे नोंदविण्यात आले.या विद्यार्थ्यांसोबत शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख डॉ.अनिल धकाते, देवराज बावनकर, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष शंकर तेलमासरे, भाजपाचे डॉ.सुनिल जीवनतारे उपस्थित होते. पोलीस निरीक्षक एस.बी. ताजने यांच्या मार्गदर्शनात सहायक पोलीस निरीक्षक सुहास चौधरी हे तपास करीत आहेत.
सहा विद्यार्थी परीक्षेपासून वंचित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 03, 2018 10:47 PM
स्थानिक स्व.हरिश्चंद्र पाटील सावरबांधे महाविद्यालयात एटीकेटी अंतर्गत बी.कॉम.च्या शेवटच्या वर्षाला असलेले विद्यार्थी बी.कॉम. भाग दोनच्या परीक्षेपासून वंचित राहिले.
ठळक मुद्देपवनी येथील प्रकरण : संचालक, प्राचार्यांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा