मोहन भोयर।लोकमत न्यूज नेटवर्कतुमसर : प्रत्येकाला हक्काचे घर मिळावे यासाठी देशपातळीवर प्रधानमंत्री आवास योजना राबविली जाते. तुमसर तालुक्यातही ही योजना राबविली जात आहे. परंतु ६ हजार १३ लाभार्थ्यांचा घरकुल निधी अद्यापही मिळाला नाही. त्यामुळे घरांचे बांधकाम रखडले आहे. २०१७-१८ मध्ये केवळ पहिला हप्ता मिळाला असून दुसऱ्या व तिसºया हप्त्याची प्रतीक्षा आहे.तालुक्यात प्रधानमंत्री आवास योजना मोठा गाजावाजा करून सुरु करण्यात आली. २०१८-१९ या आर्थिक वर्षापर्यंत ६ हजार १३ घरकुल लाभार्थ्यांनी ऑनलाईन अर्ज केले आहे. अनेकांनी बांधकामाला सुरुवात केली. परंतु घराचे नियमित हप्ते मिळत नसल्याच्या तक्रारी वाढल्या आहेत. तुमसर तालुक्यातील २०१६-१७ मध्ये लाभार्थ्यांना पहिला हप्ता मिळाला तर २०१७-१८ मध्ये अद्यापही दुसरा आणि तिसरा हप्ता प्राप्त झाला नाही. घरकुल लाभार्थ्यांनी ऑनलाईन प्रक्रियेअंतर्गत अर्ज केले. परंतु निधी नसल्याने काम रखडले आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील लाभार्थ्यांमध्ये तीव्र असंतोष पसरला आहे. पंचायत समितीचे उंबरठे झिजवून अनेक लाभार्थी थकले आहेत. याबाबतची तक्रार पंचायत समितीचे गटनेते हिरालाल नागपुरे यांनी संबंधितांकडे केली आहे. परंतु अद्यापही या लाभार्थ्यांच्या निधीबाबत कुणी बोलायला तयार नाही. आपल्या स्वप्नातील घर केव्हा पूर्ण होणार याची प्रतीक्षा सहा हजार लाभार्थ्यांना लागली आहे. तुमसर तालुक्यात प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत घरकुल लाभार्थी निवडक प्रक्रिया २०१६ पासून केली जात आहे. २०१६-१७ च्या लाभार्थ्यांना केवळ पहिला हप्ता मिळाला हीच अवस्था २०१७-१८ च्या लाभार्थ्यांची आहे. दुसरा हप्ता प्राप्त न झाल्याने अनेक जण हवालदिल झाले.कर्मचारीही वेतनाच्या प्रतीक्षेतपंतप्रधान आवास योजना राबविणारे कर्मचारी कंत्राटी पद्धतीने कार्यरत असून तुमसरमध्ये १२ कनिष्ठ अभियंता, एक ऑपरेटर गत सहा महिन्यांपासून वेतनाच्या प्रतीक्षेत आहेत. त्यांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला आहे.तुमसर तालुक्यातील घरकुल लाभार्थ्यांमध्ये असंतोष दिसत आहे. निधी नसल्याने हप्ते येत नसल्याचे सांगण्यात आले. नियोजनाअभावी योजना रखडली आहे.-हिरालाल नागपुरे,गटनेता, पंचायत समिती
सहा हजार लाभार्थी घरकुल निधीच्या प्रतीक्षेत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 19, 2020 6:00 AM
तालुक्यात प्रधानमंत्री आवास योजना मोठा गाजावाजा करून सुरु करण्यात आली. २०१८-१९ या आर्थिक वर्षापर्यंत ६ हजार १३ घरकुल लाभार्थ्यांनी ऑनलाईन अर्ज केले आहे. अनेकांनी बांधकामाला सुरुवात केली. परंतु घराचे नियमित हप्ते मिळत नसल्याच्या तक्रारी वाढल्या आहेत. तुमसर तालुक्यातील २०१६-१७ मध्ये लाभार्थ्यांना पहिला हप्ता मिळाला तर २०१७-१८ मध्ये अद्यापही दुसरा आणि तिसरा हप्ता प्राप्त झाला नाही.
ठळक मुद्देतुमसर तालुका : पंतप्रधान आवास योजनेवर प्रश्नचिन्ह, २०१६ पासून नियमित हप्तेच नाही