पारा ४१ अंशावर : जनजीवन प्रभावित, दुपारच्या सुमारास रस्ते पडले ओस, शीतपेयांची दुकाने सजलीभंडारा : एप्रिल महिन्याला सुरूवात होताच उष्णतेतही दिवसेंगणिक वाढ जाणवत आहे. सोमवारी पारा ४० अंशावर पोहोचला. रविवारी ४१ अंश सेल्सिअस तापमनाची नोंद करण्यात आली. जिवाची लाहीलाही करणाऱ्या उन्हापासून बचाव करण्यासाठी नागरिक प्रयत्न करित आहे. काल रविवारी बाजारपेठेतही वाढत्या तापमानामुळे शुकशुकाट जाणवला. या उन्हाचा पशुपक्षी आणि वन्यजीवांनाही फटका बसत आहे.मागील आठवड्यात अवकाळी पावसाने हजेरी लावली होती. परिाणमी तापनामात दोन दिवस घट झाली. ढगाळी वातावरणामुळे उन्हाची तीव्रता जाणवली नाही. परंतु मागील दोन तीन दिवसांपासून वातावरण निरभ्र झाले असून तापमान वाढत आहे. एप्रिल महिन्याच्या सुरुवातीलाच सूर्य आग ओकत असल्याचे दिसत आहे. उन्हाची तीव्रता चांगलीच वाढली आहे. सकाळी ८ नंतर तापमानात वाढ होत जाते. यापासून संरक्षण व्हावे म्हणून नागरिक टोप्या, छत्री, रुमाल बांधत आहे. वाढत्या उन्हाचा परिणाम जलस्त्रोतावरही होत आहे. नदी, नाली, ओढे कोरडे पडले असून विहिरीतील पाणी वातळीही सपाट्याने कमी होत आहे. पशुपक्षी आणि जनावरांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. यासोबतच जंगलातील पशुपक्षी व वन्यजीवांचीही पाण्यासाठी भटकंती सुरु झाली आहे. वनविभागाने अद्यापही पानवठे निर्माण केले नाही. एप्रिल महिन्याच्या पहिल्या आठवड्यातच तापमान ३९ वर पोहचल्याने आगामी काही दिवसात तापमान ४२ ते ४४ अंश सेल्सीअस होण्याची शक्यता आहे. वाढत चाललेल्या उन्हामुळे थंडपेयाची मागणी वाढली आहे. सद्यस्थितीत उष्माघाताचे रुग्ण आढळून आले नसले तरी शासकीय रुग्णालयाने नागरिकांना सूचना दिल्या आहे. जास्तीत जास्त पाणी प्यावे व सावलीचा आधार घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे. (प्रतिनिधी)
उन्हाच्या चटक्याने जिवाची काहिली
By admin | Published: April 12, 2016 12:33 AM