संतोष जाधवर ।लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : पावसाळा अगदी तोंडावर आला असला तरी अद्यापही मान्सूनपूर्व कामांना भंडारा नगरपरिषदेने गती दिली नाही. अपुऱ्या मनुष्यबळावर शहरात केवळ नाल्यांची सफाई केली जात आहे. नगरपरिषदेचे तयार केलेला आपत्ती व्यवस्थापन आराखडा अद्यापही कागदावरच आहे. पाऊस कोसळल्यास नगरपरिषदेच्या मान्सूनपूर्व कामांचे पितळ उघडे पडल्याशिवाय राहणार नाही.भंडारा ही 'ब' वर्ग नगरपरिषद असून १६.८३ वर्ग चौरस किलोमीटरमध्ये क्षेत्र विस्तारले आहे. शहरातील रस्त्यांची लांबी १३२.९६ किमी आहे. २०११ च्या जनगननेनुसार ९१ हजार ८२८ लोकसंख्या असून १६ प्रभाग आहेत. सरासरी वार्षिक पर्जन्यमान १३०९.३ मीमी असून विशालपात्र असलेली वैनगंगा नदी अगदी शहराजवळून वाहते. भंडारा शहरातील प्रत्येक रस्त्यांवर नगरपरिषदेच्या नाल्या आहेत. परंतु या नाल्या मोठ्या प्रमाणात तुंबल्या आहेत. प्लॉस्टिक बंदीनंतरही नाल्यामध्ये प्लॉस्टिकचा कचरा थांबला आहे. पावसाचे पाणी वाहून जाण्यासाठी या नाल्यांची साफसफाई करणे अपेक्षित असते. नगरपरिषदेने गत आठ दिवसांपासून या कामाला प्रारंभ केला. परंतु एवढ्या मोठ्या शहरासाठी केवळ एक जेसीबी आणि ६० मजूर आहेत. त्यामुळे पावसाळ्यापुर्वी शहरातील संपूर्ण नाल्यांची स्वच्छता होण्याची शक्यता नाही.शहरातील अनेक भागात पावसाचे पाणी साचते. अनेकांच्या घरात पाणी शिरते. त्यात कस्तुरबा वॉर्ड झोपडपट्टी, ग्रामसेवक कॉलनी परिसर, संत कबीर वॉर्ड, नेहरू वॉर्ड, भगतसिंग वॉर्ड, नवीन टाकळी, सागर तलावाचा खालचा परिसर, रूख्मिणीनगर, वैशालीनगर आदींचा समावेश आहे. तर अतिवृष्टीमुळे शहरातील नाला थोपण्याचे प्रकार घडतात. त्यात पाट्यादेव नाला, माथनी पुलिया, नागपूर नाका नाला, शिवनगरी नाला यांचा समावेश आहे. या ठिकाणी नगरपरिषदेने अद्यापही कायम स्वरूपी उपाययोजना केली नाही.भंडारा शहर वैनगंगा नदीच्या तिरावर आहे. अतिवृष्टी झाल्यास पाण्याची पातळी वाढते. मध्यप्रदेशातील धरणाचे पाणी सोडले जाते. त्यामुळे पूरपरिस्थिती निर्माण होते. नदीतिरावरील अनेक घरात पाणी शिरते. अशा रेडझोनमध्ये नागरिकांचे कायमस्वरूपी पुनर्वसन करणे अपेक्षित आहे. परंतु वर्षानुवर्ष नागरिक जीव मुठीत घेवून राहतात.नगरपरिषदेने आपत्ती व्यवस्थापनाचा आराखडा तयार केला आहे. त्यामध्ये विविध उपाय सुचविण्यात आले आहेत. परंतु त्याची प्रभावीपणे अंमलबजावणीची गरज आहे. पावसाळ्याच्या दिवसात साथीचे रोग पसरू नये याची काळजी घेणे अपेक्षित आहे. तसेच पाणीपुरवठा ठप्प झाल्यास आपातकालीन व्यवस्थाही तयार ठेवण्याची गरज आहे.केवळ १२ इमारती धोकादायकभंडारा नगरपरिषदेच्या क्षेत्रात २० हजार २५१ घरे आहेत. यातील अनेक घरे सध्या धोकादायक स्थितीत आहे. परंतु नगरपरिषदेने केलेल्या सर्व्हेक्षणात केवळ १२ घरे धोकादायक असल्याचे सांगण्यात आले. त्यात रविंद्रनाथ टॉगोर वॉर्ड, गांधी चौक, संताजी वॉर्ड, तिलक वॉर्ड, देशबंधू वॉर्ड, महात्मा फुले वॉर्ड, आझाद वॉर्डातील घरांचा समावेश आहे. या धोकादायक घरांचे निर्लेखन करणे गरजेचे आहे. तसेच आणखी धोकादायक इमारतीचा शोध घेण्याची गरज आहे. अन्यथा इमारत कोसळून राहणार नाही याची भीती आहे.
मान्सूनपूर्व कामांची गती संथ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 14, 2019 11:54 PM
पावसाळा अगदी तोंडावर आला असला तरी अद्यापही मान्सूनपूर्व कामांना भंडारा नगरपरिषदेने गती दिली नाही. अपुऱ्या मनुष्यबळावर शहरात केवळ नाल्यांची सफाई केली जात आहे. नगरपरिषदेचे तयार केलेला आपत्ती व्यवस्थापन आराखडा अद्यापही कागदावरच आहे.
ठळक मुद्देभंडारा नगरपरिषद : मनुष्य बळाचा अभाव, पावसाळा तोंडावर