चंदन मोटघरेलोकमत न्यूज नेटवर्कसाकोली : वाटमारी प्रकरणाने तांदूळ तस्करीचे प्रकरण पुढे आले असून, एवढ्या मोठ्या प्रमाणात जिल्ह्यात तांदळाची चोरटी आयात होत असेल तर आधारभूत केंद्रावर खरेदी केलेला धान जातो कुठे? असा प्रश्न आता निर्माण झाला आहे. जिल्ह्यातील धानाचे गोदाम मात्र भरडाईच्या प्रतीक्षेत हाऊसफुल्ल आहेत. परप्रांतीय तांदळाच्या आयातीत कोट्यवधींची उलाढाल होत असताना जिल्हा पुरवठा विभाग मात्र अद्यापही झोपेत आहे.पूर्व विदर्भात भंडारा, गोंदिया, चंद्रपूर आणि गडचिरोली हे चार जिल्हे धानशेतीसाठी प्रसिद्ध आहेत. हजारो क्विंटल धानाचे उत्पादन घेतल्या जातो. यावर्षी सर्वच शासकीय धान खरेदी केंद्राचे गोदाम हाऊसफुल्ल झाले आहेत. शासनाने धान ठेवण्यासाठी शाळा भाड्याने घेतल्या. धानाची भरडाई करून तांदूळ शासनाला देण्यासाठी राईस मिल मालकांना धान दिला जातो. आदेशानुसार आधारभूत धान खरेदी केंद्रातून धानाची उचल होते. मात्र त्या तुलनेत शासनाला तांदळाचा पुरवठा दुप्पट केला जातो. हे नेमके कसे? हा न समजणारा प्रश्न आहे. दर महिन्याला शासनाच्या गोदामामध्ये लाखो क्विंटल तांदळाची आवक होते. तो तांदूळ स्वस्त धान्य दुकानदाराला वितरित केला जातो. तांदळाची आवक पाहिल्यानंतर गोदामातील धान जसेच्या तसे कसे, असा प्रश्न निर्माण होतो. जिल्हा पुरवठा विभागाचे याकडे हेतुपुरस्सर दुर्लक्ष होत आहे. ज्या राईस मिल मालकांना धान उचलण्याचे आदेश देण्यात आले ते खरोखरच गोदामातून धानाची उचल करतात काय? असा पश्न यानिमित्ताने पुढे येत आहे. वाटमारी प्रकरणात पोलिसांनी विविध दिशेने चौकशी सुरू केली आहे. मात्र भंडारा जिल्हा पुरवठा विभागाने अद्यापपर्यंत याबाबत कोणतीही भूमिका घेतली नाही. त्यामुळे त्यांच्यावरही संशयाची सुई वळत आहे.शासनाने दिवाळीत खरेदी केलेल्या धानाची किती संस्थांना उचल आदेश दिले होते. गोदामातून किती धानाची उचल करण्यात आली. त्या तुलनेत किती तांदूळ पाठविण्यात आला याची चौकशी करण्यात आली तर खरोखरच परप्रांतीय तांदळाची किती आयात होते याची माहिती मिळू शकते. भंडारा जिल्ह्यात मध्यप्रदेश आणि तेलंगाना राज्यातुन तांदळाची आयात केली जाते. यासोबतच स्वस्त धान्य दुकानातून लाभार्थ्यांना दिला जाणारा तांदुळही विकल्या जात असल्याची माहिती आहे. भरडाईनंतर शासनाला दिल्या जाणाऱ्या तांदळाची गुणवत्ता कधीच तपासली जात नाही. नवीन धानापासून तयार झालेल्या तांदळाची गुणवत्ता दर्जेदार असायला हवी. परंतु भरडाई होऊन शासनाकडे आलेला तांदूळ कोणत्या दर्जाचा असतो हे सांगायची कुणालाही गरज नाही. भंडाराच नव्हे तर पूर्व विदर्भातील गोंदिया, गडचिरोली आणि चंद्रपूर जिल्ह्यातही असाच प्रकार गत काही वर्षापासून सुरु आहे. परंतु त्याकडे सर्वांचे सोयीस्कररित्या दुर्लक्ष केले जाते. साकोलीजवळ वाटमारी झाली नसती आणि पोलिसांनी या दिशेने तपास केला नसता तर आणखी कितीतरी वर्ष तांदळाची तस्करी सुरु राहिली असती. शासनाला कोट्यवधी रुपयाने चुना लावणाऱ्या काही राईस मील मालक आणि तांदूळ तस्करांचे हितसंबंध वरपर्यंत आहेत. राजकीय आश्रयाशिवाय हा प्रकार होऊ शकत नाही हे त्रिकालाबाधित सत्य आहे. त्यामुळेच तांदूळ तस्करीचे प्रकरण राजकीय दबावातून निस्तारण्याचीही दाट शक्यता आहे. आता पोलीस नेमके कुठपर्यंत मजल मातात आणि या तांदळाच्या तस्करीचे पाळेमुळे खोदून काढतात याकडे भंडारा जिल्ह्यातील नागरिकांचे लक्ष लागले आहे.
महाराष्ट्रातील तांदळाकडे दुर्लक्ष- परप्रांतीय तांदूळ आणून त्याच तांदळाची शासनाला विकण्याचा गोरखधंदा सध्या जिल्ह्यातच नव्हे तर पूर्व विदर्भात फोफावला आहे. यात अधिकाऱ्यांचाही वाटा असल्याची चर्चा आहे. संगनमतातून परप्रांतीय तांदूळ येथे आणला जातो. परंतु भंडारा जिल्ह्यात तयार झालेला उत्कृष्ट प्रतीच्या तांदळाकडे मात्र दुर्लक्ष होत आहे. कोट्यवधींच्या व्यवहारात शेतकऱ्यांचे धान तसेच पडून राहतात. वाटमारीतील रोख पोलिसांकडे- साकोली तालुक्यात चार दिवसांपूर्वी २२ लाख ५० हजार रुपयांची वाटमारी झाली होती. साकोली पोलीस आणि स्थानिक गुन्हे शाखा या प्रकरणाचा तपास करीत आहेत. सध्या २२ लाख ५० हजारांची रोख साकोली पोलिसांच्या ताब्यात आहे. ही रक्कम तांदळाच्या खरेदीची असल्याचे स्पष्ट झाले असले तरी खरेदी केलेला तांदूळ नियमानुसार की नियमबाह्य याचा निर्णय व्हायचा आहे तोपर्यंत ही रक्कम पोलिसांच्याच ताब्यात राहणार आहे.
एसआयटीमार्फत चौकशी आवश्यक- भंडारा जिल्ह्यातील तांदूळ तस्करी प्रकरणाची चौकशी स्पेशल इन्व्हेस्टिगेशन टीम (एसआयटी) द्वारे करण्याची गरज आहे. एसआयटीचे विशेष पथक तयार करून या प्रकरणाची चौकशी केल्यास मोठे घबाड बाहेर येऊ शकते. भंडारा व गोंदिया जिल्ह्यातील सुरू असलेल्या परप्रांतीय तांदूळ खरेदी प्रकरणाची एसआयटीमार्फत चौकशी करण्याची खरी गरज आहे. पोलीस त्या दृष्टीने चौकशी करीत आहेत. आयकर, विक्रीकर आणि जीएसटी विभागाला अहवालही मागितला आहे. परंतु खरी चौकशी होईल की नाही हा तेवढाच संशोधनाचा विष आहे.