रेल्वे प्रशासनाचे दुर्लक्ष : छत्तीसगड तथा गोंदियातून होतो मद्याचा पुरवठामोहन भोयर । लोकमत न्यूज नेटवर्कतुमसर : सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर सर्वत्र देशी विदेशी दारु विक्री बंदी झाली आहे. नियमानंतर्गत सुरु असलेल्या मद्याच्या दुकानातून प्रवाशी रेल्वे गाडीतून तुमसर रोड, भंडारा रोड रेल्वे स्थानकावर विदेशी दारुची खेप येणे सुरु आहे. ही दारु कापडी पिशवी तथा थंडपेय ठेवलेल्या बादलीतून आणले जात असल्याची धक्कादायक माहिती आहे. रेल्वे अधिकारी तथा रेल्वे पोलिसांच्या कार्यप्रणालीवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.तुमसर शहरात केवळ बिअर बार नुकतीच सुरु झाली. संपूर्ण तुमसर तालुक्यात मद्यविक्री बंद आहे. यातून मार्ग काढण्याकरिता प्रवाशी रेल्वेगाडीने सर्रास विदेशी मद्याची खेप नियमितपणे तुमसररोड तथा अन्य रेल्वे स्थानकावर येत असल्याची माहिती आहे. छत्तीसगड राज्यातून तथा गोंदिया, तिरोडा येथून ही विदेशी मद्याची नियमबाह्य तस्करी सध्या सुरु आहे. गोंदिया शहरात विदेशी मद्याची काही दुकाने सुरु आहेत. छत्तीसगड राज्याच्या सीमा आमगाव लागून आहेत. तिरोडा रेल्वे स्थानकाजवळ एक बिअर बार सुरु आहे. विदेशी मद्याचे शौकीन येथून मद्य नियमित बोलवित आहेत. मद्यशौकीन जादा दराने खरेदी करीत आहेत. प्रवाशी रेल्वे गाडीतूून मोठी कापडी पिशवी तथा थंडपेयाच्या बाटलीखाली विदेशी मद्याच्या बाटल्या आणल्या जातात. रेल्वेगाडीत सामानाची तपासणी होत नाही. त्या संधीचा फायदा येथे घेणे सुरु आहे. रेल्वेचे सुरक्षा बल तथा रेल्वे पोलीस प्रवाशी रेल्वे गाडीत राहतात. सर्वसामान्यांना सध्या हा प्रकार माहिती झाला तर संबंधित विभागाला माहिती नाही असे म्हणणे अतिशयोक्ती ठरत आहे. विदेशी मद्य तस्करी करणारे युवकांपासून सर्वसामान्यांना धोका आहे. त्यामुळे त्यांच्या विरोधात कुणी बोलायला तयार नाही. पाहून न पाहिल्यासारखे करण्यातच सामान्यांचे हित आहे. त्याकडे म्हणून दुर्लक्ष केले जात आहे. मद्यविक्रीची दुकाने, बार बंद झाले. परंतु मद्यशौकीनांना मात्र नियमित पुरवठा सुरुच आहे. फरक एवढाच आहे की, त्या मद्याची त्यांना जादा किंमत द्यावी लागत आहे. रेल्वे प्रशासनाने ही विदेशी मद्याची तस्करी रोखण्याची गरज आहे.तुमसर शहरात गावठी दारुची विक्रीविदेशी मद्याची दुकाने तथा बिअर बार बंद असल्याने मद्यशौकीनांनी मोर्चा मोहफुल दारुकडे वळविल्याचे चित्र मागील दोन महिन्यापासून सर्वत्र दिसत आहे. शहराबाहेरील परिसरात सर्रास मोहफुल विक्री केंद्र सुरु आहेत. संध्याकाळी तिथे प्रचंड मद्यशौकीनांची गर्दी पाहायला मिळते. सर्वसामान्यांच्या डोळ्यात ते दिसत आहे. परंतु बोलायला तथा तक्रार करायला कुणीच पुढे येत नाही. पोलीस प्रशासन अनभिज्ञ आहे असे नाही. परंतु कारवाई अद्यापपावेतो झाली नाही. त्यामुळे मुक संमती नक्कीच येथे दिसून येत आहे. ग्रामीण परिसरातील गावातही सध्या हेच चित्र दिसत आहे. या प्रकाराला रोखण्याकरिता प्रशासनच खुद्द गंभीर दिसत नाही. पारदर्शीकता हा शब्द केवळ कागदावरच बरा वाटतो. वास्तविक स्थिती उलट आहे.
प्रवाशी रेल्वेतून विदेशी मद्याची तस्करी
By admin | Published: June 01, 2017 12:27 AM