भंडारा : तालुक्यातील वाघबोडी जंगलात प्रौढ अस्वलाचा मृत्यू सर्पदंशाने झाल्याचा प्राथमिक अंदाज पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांनी व्यक्त केला. गत १२ मे रोजी २० वर्षीय नर अस्वल मृतावस्थेत आढळून आले होते.
भंडारा वनपरिक्षेत्रातील दवडीपार उपवन क्षेत्रांतर्गत खापा नियत क्षेत्रातील कक्ष क्रमांक २८६ मध्ये नर अस्वल मृतावस्थेत आढळून आले होते. या घटनेची माहिती मिळताच, उपवनसंरक्षक एस.बी. भलावी, गडेगावचे प्रकाष्ठ निष्कासन अधिकारी एस.एन. शेंडे, भंडाराचे वनपरिक्षेत्राधिकारी विवेक राजूरकर घटनास्थळी पोहोचले. लाखनीचे पशुवैद्यकीय अधिकारी डाॅ.गुणवंत भडके, डाॅ.हटवार यांनी अस्वलाचे शवविच्छेदन केले. या अस्वलाचा मृत्यू घोणस सापाच्या दंशामुळे झाला असावा, असा पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांचा प्राथमिक अंदाज आहे. मृत अस्वलाचे त्याच वेळी पंचांसमक्ष दवडीपार रोपवाटिकेत दहन करण्यात आले असल्याची माहिती उपवन संरक्षक भलावी यांनी दिली.