भंडारा : साप दिसला की भल्याभुल्यांची घाबरगुंडी उडते. त्यातल्या त्यात जातीवंत नाग म्हटलं की भीतीने अंगावर काटा उभा राहतो. असाच एक नाग लाखांदूर तालुक्यातील सरांडी (बु.) येथील एका घरात तब्बल एक दोन दिवस नव्हे, तर ७ दिवसांपासून दबा धरून बसून होता. या दबा धरून बसलेल्या नागाला आठव्या दिवशी पकडण्यात यश आले. अन् त्यानंतर घरातील सदस्यांनी सुटकेचा नि:श्वास टाकला. या सापाला सर्पमित्रांच्या चमूने गुरुवारी सुरक्षित जंगलात सोडून जीवनदान दिले.
लाखांदूर तालुक्यातील सरांडी (बु.) येथील सुशील बनकर यांच्या घरात १२ जानेवारी रोजी अचानक एक मोठा ६ फूट लांब नाग जातीचा साप दिसला. साप दिसताच परिवारातील सर्व सदस्यांनी घरातून बाहेर पळ काढला. दरम्यान, येथीलच सर्पमित्र जागेश्वर कांबळे यांना बोलाविण्यात आले. सर्पमित्रांनी या सापाचा शोध घेतला असता सापाने घरातच दबा मारला असल्याचे लक्षात आले. यावेळी साप दिसला नसल्याने घरातील सदस्यांनी तसेच सर्पमित्रांनी साप पळून गेला असल्याचा अंदाज बांधला.
मात्र, दुसऱ्याच दिवशी पुन्हा तोच साप घरातच दिसून आला. परत सर्पमित्राला बोलावणे आणि सापाची लपाछपी ! असा हा खेळ तब्बल सात दिवस चालला. अखेर आठव्या दिवशी २० जानेवारी रोजी पुन्हा तोच साप निघाला. साप दिसताच त्याच्यावर नजर ठेवून तत्काळ सर्पमित्र जागेश्वर कांबळे यांना बोलावण्यात आले. जागेश्वर यांनी त्यांच्या सहकारी सर्पमित्रांच्या सहाय्याने मोठ्या शिताफिने त्या सापाला पकडले. या सापाला सर्पमित्रांनी दांडेगाव येथील जंगलात सुरक्षित सोडले. यावेळी सर्पमित्र आकाश तिघरे, प्रकाश राऊत, रुपेश टेम्भुरकर, रक्षित बनकर या सर्पमित्रांच्या चमूने सहकार्य केले.