लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा: वाढत्या नागरीकरणासोबतच जंगलांचा आकार कमी होत गेला. मानवी वस्ती लगत साप आढळून येण्याचे प्रमाण वाढत गेले तर, दुसरीकडे नागपंचमीला साप दिसला की, पूजन करण्यात येते मात्र अन्य दिवशी साप आढळला तर, त्याला मारण्यात येते. त्याचा जीव घेण्यात येतो. वास्तवात साप हा शेतकऱ्याचा मित्र आहे. विषारी आणि बिनविषारी साप ओळखणेही महत्त्वाचे झाले आहे. सरपटणाऱ्या प्राण्यांमध्ये सापाचा समावेश असतो. पावसाळ्याच्या दिवसात बिळामध्ये पाणी शिरल्याने साप बाहेर येताच त्यांच्यावर हल्ला चढवितात. नागपंचमीला त्याच सापाचे पूजन केले जाते मात्र अन्य दिवशी हा साप आढळला तर त्याचा जीवच घेतला जातो, ही बाब अयोग्य आहे.
साप हा शेतकऱ्याचा मित्र
एकंदरीत पाहता साप हा शेतकऱ्यांचा मित्र आहे. शेतामध्ये असणारे लहान-मोठे जीवजंतू किंवा अन्य मोठे किडे याचे साप भक्षण करीत असतो. हे एक प्रकारे पिकांचे संरक्षण सापांच्या माध्यमातून होत असते. त्यामुळे साप हा शेतकऱ्यांचा मित्र म्हणून ओळखला जातो .
विषारी
भंडारा जिल्ह्यात घोणस, साधा मण्यार, नागराज, पट्टेरी मण्यार या चार विषारी प्रजाती प्रामुख्याने आढळतात.
बिनविषारी
जिल्ह्यात वास्या, धोंड्या, मांडोळ, धूळनागीण तिडक्या, धामण, पट्टेरी मण्यार, गवत्या आदी.
सर्पमित्र काय म्हणतात...
साप आढळला तर, गोंधळ किंवा जास्त हालचाल करू नका. दारे खिडक्या बंद करून घ्या किंवा शेतशिवारात साप आढळला असेल तर, तिथून बाजूला व्हा. सर्प मित्राच्या मदतीने त्याला जंगलात सोडून द्या.
-योगेशकुमार पशिने, सर्पमित्र
साप आढळला तर
घर परिसरात किंवा शेतशिवारात साप आढळल्यास मारू नका. त्याच्यावर हल्ला करणे योग्य नाही. साप हा अतिशय शांत असतो. ज्यावेळी त्याला धोका किंवा असुरक्षितता वाटते, तेव्हाच तो दंश करतो. प्रत्येक साप हा विषारी असतो, हा गैरसमज आहे. विषारी व बिनविषारी साप कोणते, ही बाब आपण ओळखली पाहिजे. त्यामुळे साप दिसताच किंवा चावा घेतल्यास घाबरून जाऊ नका. विष शरीरात पसरू नये, याची प्रथम काळजी घेऊन रुग्णालयात जावे.