विशाल रणदिवे
अडयाळ :
नेरला उपसा सिंचन योजनेचे पाणी यंदा शेतकऱ्यांना मिळणार की नाही?, असा प्रश्न नेरला उपसा सिंचन योजनेच्या लाभार्थ्यांना पडला आहे. एकीकडे पावसाने दडी मारली आणि दुसरीकडे उपविभागीय अभियंता पागोरा उपसा सिंचन उपविभाग क्र. १ आंबाडी कार्यालय मार्फत गावागावांत एक जाहीर सूचनेचे पत्रक लावण्यात आले आहे. त्यात पाणीपट्टी जमा केल्याशिवाय यावर्षी सिंचनाकरिता पाणी सोडण्यात येणार नाही, असे सांगण्यात आले आहे.
आता पुन्हा शेतकरी निसर्गासोबतच नेरला उपसा सिंचनही जर कोपला तर पुढे काय होणार? नेरला उपसा सिंचन योजनेचे २०१५-१६ ला ई-जलपूजन झाले. शेतकऱ्यांना सिंचनासाठी पाणी मिळत गेले आणि आजही कामे पूर्ण झाली नाही. २०१८-१९-२०-२१ या तिन्ही वर्षाची खरीप हंगाम पाणीपट्टी ज्यांच्याकडे थकबाकी आहे. अशा शेतकऱ्यांना आंबाडी कार्यालयात भरणे आहे. नेरला उपसा सिंचन यामध्ये एकूण १२ व्हीटी पंप तेही १०१५ अश्वशक्तीचे लावले गेले असल्याची माहिती आहे. गत चार वर्षेपासून सुरू आहे. त्यातील दोन वर्षे वगळता फक्त तीन वर्षांचे हेक्टरी ६००, ९०० रुपये शेतकऱ्यांना भरणे आहेत.
माहितीनुसार धक्कादायक बाब समोर आली आहे. ती म्हणजे आत्तापर्यंत जेवढी रक्कम आहे. त्यातून एक पाव सुद्धा रक्कम जमा होत नसल्याने येथील अधिकारी व कर्मचारी सुद्धा चिंतेत असल्याचे बोलले जात आहे. एकंदरीत नेरला उपसा सिंचन अधिकारी आणि शेतकरी दोन्ही चिंताजनक स्थितीत आहेत. या नेरला उपसा सिंचनामुळे शेतकऱ्यांना फायदा तर झालाच, पण येथील कामे आजही अपूर्ण असल्याने शेतकरी सुद्धा चिंता व्यक्त करतो आहे. अड्याळ आणि परिसरात पाहिजे त्या प्रमाणात पाऊस शेतकऱ्यांना दिलासादायक पडतो की नाही हे एक कोडेच आहे, पण पाणी जर लागलेच तर मग नेरला उपसा सिंचन शिवाय पर्याय नाही असे असले तरी जोपर्यंत शेतकरी पाणीपट्टी रक्कम जमा करणार नाही तोपर्यंत सिंचनाचे पाणी सोडण्यात येणार नाही.