समाजसुधारणेचा ३५ वर्षाचा वसा : शाहीरीतून साकारतो सृजनशील समाजपालांदूर : जीवनात प्रत्येकाला छंद असतोच. त्यांचे मूल्य अगणिक असते. समाजसेवा, मनुष्यप्रेम जोपासण्याचा छंद काही निराळाच असतो. निस्वार्थ अविरत आयुष्याची ३५ वर्ष शाहीरी करून समाजाला अंधश्रद्धेतून काढून राष्ट्रसंतांच्या मार्गावर चालण्याचा संदेश देत विश्वनाथ आता साठीच्या वर गेला आहे. वृद्धावस्थेमुळे त्याच्या उपजीविकेचा प्रश्न ऐरणीवर असल्याने त्यांनी उदरनिर्वाहाकरिता शासनदरबारी आस ठेवली आहे. लाखनी तालुक्यातील पालांदूर जवळील कोलारी (पटाची) येथील विश्वनाथ बोरकर हे साहित्यीक असून शाहीरीतून त्यांनी समाजाला प्रेरणादायी विचाराची प्रसाद वाटली आहे. अविरत सेवेतून त्यांनी आपली ओळख सामान्यापासून ते असामान्यापर्यंत पोहचवली आहे. अख्ख्या जिल्ह्यात दुर्गा, मंडई, पट आदी उत्सवात पैशाचा मोह न बाळगता कुटुंबाला वाऱ्यावर सोडत शाहीरीचा छंद जोपासत फुकटात समाजाल शहाणे केले. त्यांच्या शाहीरीत इतिहासातील शिवाजी महाराज, अहिल्या होयकर, राणी लक्ष्मीबाई, राजकारणात चाचा नेहरु, इंदिरा गांधी, अटलबिहारी वाजपेयी, राजीव गांधी, कौटील्याची चाणक्य निती, राष्ट्रसंतात तुकडोजी, गाडगेबाबा, डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे काव्यपंक्तीतून गायन करीत चुटकुले सांगून अलगत विचार पटवून देण्याच्या अविरत कलेने विश्वनाथ समाज मनात बसला आहे. मात्र आता वयपरत्वे शरीर साथ देत नसल्याने कुटुंबही त्रास देत आहे. अशावेळी शासनाच्या मदतीची आस विश्वनाथला लागली आहे. वृद्ध कलाकार, साहित्यीक मानधन योजनेत सामावण्याची मागणी आहे. (वार्ताहर)
समाज प्रबोधनकार विश्वनाथला शासकीय मदतीची गरज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 28, 2016 12:35 AM