पवनी : महिला या सामाजिक जीवनात नव्हे तर कौटुंबिक स्तरावर मोठ्या प्रमाणात हिंसाचाराला बळी पडत आहेत. हिंसाचार किंवा अत्याचाराविरुद्ध स्त्री जोपर्यंत आवाज उठवत नाही तोपर्यंत तिचे संरक्षण आणि सबलीकरण शक्य नाही. ज्या समाजात महिलांना मान नाही तो समाज विकसित होऊ शकत नाही. समाजाची स्त्रियांप्रति मानसिकता बदलणे अत्यंत गरजेचे आहे तसेच स्त्रियांना सामाजिक, शारीरिक, कौटुंबिक, आर्थिक स्वावलंबित्व प्रदान करणे गरजेचे आहे, कायद्याच्या माध्यमातून स्त्रियांचे समक्षीकरण साधले जाऊ शकते. या स्थितीत महिलांसमोरील सामाजिक व न्यायिक आव्हाने यावर चर्चा घडवून आणणेही आवश्यक आहे, असे प्रतिपादन माजी पंचायत समिती सदस्या, भाजपा पवनी तालुका महिला मोर्चा अध्यक्षा माधुरी नखाते यांनी केले.
निघवी येथे जागतिक महिला दिन साजरा करण्यात आला. त्यावेळी त्या बोलत होत्या. या कार्यक्रमाचे संचालन रजनी तरोने तर आभार प्रदर्शन शिल्पा शेंडे यांनी केले. या कार्यक्रमाला प्रमुख वक्ता म्हणून भाजपा तालुका महिला मोर्चा अध्यक्ष माधुरी नखाते, प्रमुख पाहुणे निघवीच्या सरपंच सीमा तरोने, माजी सरपंच मनीषा फुंडे, ग्रा.पं. सदस्या ब्राह्मणकर, शिल्पा चन्ने, अंगणवाडी सेविका फुंडे, अर्चना वासनिक, सुशीला फुंडे, वैशाली डोये मंचावर उपस्थित होत्या. या कार्यक्रमाला निघवी येथील शेकडो महिलांनी हजेरी लावली होती.