भंडारा : गोसे प्रकल्पाच्या बॅकवाॅटरमुळे भंडारा शहरासह गणेशपुरचे सांडपाणी वाहून जाण्यासाठी तयार करण्यात येत असलेल्या पंपहाऊसच्या कामात मातीचा भराव केला जात आहे. निकृष्ट कामामुळे बॅक वाॅटरचे पाणी भविष्यात भंडारा शहरात शिरुन मोठा अनर्थ होण्याची शक्यता आहे. मात्र या कामाकडे कुणाचेही लक्ष दिसत नाही.
गोसे पुनर्वसन विभागांतर्गत भंडारा शहरातील पिंगलाई ते भंडारा, गणेशपूर दरम्यान १३ किमीची संरक्षक भिंत बांधण्यात आली आहे. भंडारा स्मशानभूमीलगत पंपहाऊसचे काम सुरु आहे. भंडारा शहरातील सांडपाणी, पावसाळ्यातील पाणी वाहून जाण्यासाठी पंपहाऊस उभारण्याचे काम सुरु आहे. पंपहाऊस शेजारी असलेल्या तलावात पाणी साठवून पंपहाऊसच्या माध्यमातुन संरक्षक भिंतीच्या पलिकडे पाणी सोडण्याची ही योजना आहे. नागपूर येथील एका कंत्राटदाराला काम देण्यात आले आहे. सध्या पंपहाऊसची इमारत अर्धवट स्थितीत असून संरक्षण भिंतीलगत पंपहाऊसजवळ भराव टाकण्याचे काम सुरु आहे. नियमानुसार मुरुममिश्रीत माती टाकुन भराव करणे गरजेचे आहे. परंतु कंत्राटदाराने थेट लगतच्या परिसरातील माती या भरावात टाकली आहे. त्यामुळे भविष्यात हा भराव खचल्यास गोसेचे बॅकवाॅटर आणि भंडारा शहरातील सांडपाणी थेट गणेशपुरसह भंडारा शहरातील काही भागात शिरण्याची शक्यता आहे. हा प्रकार सुरु असला तरी वरिष्ठांचे मात्र याकडे लक्ष नव्हते.
तक्रारीनंतर गोसे प्रकल्पाच्या उपकार्यकारी अभियंत्यांनी या कामाला भेट देऊन पाहणी केली. काम थांबविण्याचे निर्देश दिले. मात्र या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याचे अद्यापही निर्देश दिले नाहीत.
निकृष्ट कामाची वरिष्ठांकडे तक्रार
राष्ट्रवादी जिल्हा युवक काँग्रेसचे अध्यक्ष यशवंत सोनकुसरे यांनी जलसंपदा मंत्री, गोसेखुर्द विभाग नागपुरचे अधीक्षक अभियंता यांच्यासह जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार दाखल केली. तुर्तास काम थांबविण्याचे निर्देश देण्यात आल्याची माहिती आहे. परंतु पंपहाऊसचे काम मजबुत होण्यासाठी कोणत्याही उपाययोजना केल्या जात नसल्याचे दिसत आहे. या कामासोबतच इतर कामातही मोठ्या प्रमाणात गैरप्रकार होत असल्याची तक्रार आहे. या संपुर्ण प्रकरणाची चौकशी झाल्यास प्रकरण बाहेर येण्याची शक्यता आहे.