मुखरू बागडे
भंडारा : दिवाळी अर्थात प्रकाशाचे पर्व मंगळवारपासून सुरू होत आहे. दिवाळीचा आनंद घराघरांत स्वच्छतेतून दिसत आहे. प्रकाशाच्या पर्वात घरात लख्ख प्रकाशासाठी आजही विज्ञान युगात पणत्यांना मागणी आहे. ग्राहकांची मागणी लक्षात घेता, कुंभार दादा रोज चाकावर ५०० पणत्यांना आकार देत आहे. वीस रुपयांत डझनभर पणत्या विक्रीला उपलब्ध आहेत.
ग्रामीण भागात हाती बोटी पैसा नसला तरी आनंद उत्सव घराघरातून ओसंडून वाहत आहे. परंपरेचा आधार घेत प्रत्येक घरात स्वच्छता मोहीम अंतिम टप्प्यात आलेली आहे. लक्ष्मीपूजनचा उत्सव दीपावलीच्या पाच दिवसांत अत्यंत महत्त्वाचा समजला जातो. काही ठिकाणी दिवाळीच्या पाच दिवसांत आपापल्या सोयीने लक्ष्मीपूजनाचे महत्त्व सांभाळले जाते.
पालांदूर येथे पंचमीच्या दिवशी तर काही गोवर्धन पूजेच्या दिवशी लक्ष्मीपूजन पार पाडतात. पाच दिवस लख्ख प्रकाशाचे तेही पणत्यांच्या लख्ख प्रकाशात अख्खं घर न्हाऊन निघते. देवघरापासून तर खिडक्या, दारे, अंगणापर्यंत पणत्यांच्या साक्षीने दिव्यांची सोय केली जाते. प्रत्येक घरातून पणत्यांची मागणी आजही कायम आहे. कुंभार दादा लक्ष्मी मातेसह पणत्यांना सुद्धा चाकावरून मातीला आकार देत आहेत.
बाजारात इलेक्ट्रिक पणत्या विक्रीला आहेत. जगाच्या बदलत्या रूपानुसार यांत्रिक युगातही मातीच्याच पणत्यांना ग्रामीण भागात तरी पसंती सर्वाधिक आहे. यानिमित्ताने कुंभारवाड्यात प्रत्येकाला काम मिळून दिवाळीचा आनंद घराघरात अनुभवायला मिळत आहे. काळ्या मातीला चाकावर आकार देत भट्टीत तिला लाल करीत सोनेरी रंग देत मातीला सोन्याचे रूप दिले जाते.
शनिवार आठवडी बाजार हा दीपावलीच्या पूर्वसंध्येला अत्यंत महत्त्वाचा ठरलेला आहे. ग्राहकांनी खरेदीकरिता आठवडी बाजारात गर्दी केली आहे. मिठाईच्या दुकानापासून तर फटाक्यांच्या दुकानापर्यंत ग्राहकांची विचारपूस सुरू झालेली आहे. सायंकाळच्या चार वाजेनंतर बाजारपेठेत ग्राहकांची गर्दी नजरेत भरणारी आहे. शेतकरी दादाचा हंगाम बऱ्यापैकी असल्याने यंदाचा दीपोत्सव आनंददायी व उत्साही ठरणार आहे हे निश्चित!
लक्ष्मी मातेला रंगरंगोटी आटोपलेली असून नक्षीदार पणत्या अंतिम टप्प्यात आलेल्या आहेत. विजेवर चालणाऱ्या पणत्यांना मागणी किती आहे, हे कळणार जरी नसले तरी आमच्या मातीच्या पणत्यांना मात्र घराघरातून मागणी होते. महागाई डोईजड असली तरी, आम्ही आमच्या मेहनतीचा विचार करून कमीत कमी वीस रुपयाला डझनभर पणत्यांचा दर ठरविलेला आहे.
मोरेश्वर पाथरे, कुंभारपुरी, पालांदूर.