अटल सौर कृषिपंप योजना : भिलेवाडा येथे शुभारंभभंडारा : अटल सौर कृषिपंपाअंतर्गत जिल्ह्यातील भिलेवाडा येथील शेतकरी आकर्ष अरुण बांते व कुलदिप मनोहर बांते यांच्या शेतीमध्ये तीन अश्वशक्तीच्या डीसी सौर कृषीपंप कार्यान्वित करण्यात आले.सौर कृषिपंपाला जिल्हाधिकारी तथा भंडारा जिल्हा सौर कृषिपंप निवड समिती अध्यक्ष धीरजकुमार यांनी शनिवारला सकाळी ११ वाजता भिलेवाडा येथे प्रत्यक्ष भेट दिली. भेटी दरम्यान सौर कृषिपंपाचे लाभार्थी आकर्ष अरुण बांते व कुलदिप मनोहर बांते सहपरिवारासह शेतावर उपस्थित होते. सोबतच भंडारा पंचायत समितीचे सभापती प्रल्हाद भुरे, सरपंच प्रव्हिनी बांते, आनंदराव निंबार्ते, नामदेव हजारे यांच्यासह गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.जिल्हाधिकारी धीरजकुमार यांचेसोबत महावितरण कंपनीचे अधीक्षक अभियंता सुरेश एम.मडावी, कार्यकारी अभियंता (प्रशासन) अनिल के.गेडाम, भंडारा विभागाचे कार्यकारी अभियंता हिवरकर, भंडारा ग्रामीण उपविभागाचे उपकार्यकारी अभियंता प्रदीप भोयर तसेच जैन एरिगेशनतर्फे कार्यकारी अभियंता नंदू पाटील उपस्थित होते. नंदू पाटील यांनी जिल्हाधिकारी, शेतकरी वर्ग व उपस्थित गावकऱ्यांना माहिती देवून प्रत्यक्ष सौर कृषीपंप सुरु करून दाखविले. जैन एरीगेशन कंपनीतर्फे ५ वर्षाची मेंटेनन्स, वॉरंटी व देखभाल दुरुस्ती करण्यात येणार आहे. सौर कृषीपंपाचा शासनातर्फे विमा करण्यात येणार आहे .सौर कृषीपंप यंत्रणेला विजेपासून सुरक्षा मिळविण्याकरिता वीजरोधक यंत्रणा बसविण्यात आलेली आहे.भंडारा जिल्ह्यामध्ये एकुण १९५ सौर कृषीपंपाचे उद्दिष्ट देण्यात आलेले आहेत. आतापर्यंत ४० शेतकऱ्यांचे अर्ज जिल्हा निवड समितीतर्फे निवड करण्यात आली आहेत. तसेच २५ लाभार्थी शेतकऱ्यांचे अर्जाचे सर्वेक्षण पूर्तता झाले असून ते लवकरच मंजूर करण्यात येईल. जिल्ह्यातील शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहन जिल्हाधिकारी महावितरणचे अधीक्षक अभियंता सुरेश मडावी यांनी केले. या योजनेमध्ये शेतकऱ्यांना ५ टक्के हिस्सा भरावयाचा असून ९५ टक्के शासनातर्फे अनुदान देण्यात येत आहे. प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य या तत्वावर ३, ५, ७, ५ अश्वशक्तीचे सौर कृषी पंपाचा या योजनेमध्ये समावेश केला आहे. (नगर प्रतिनिधी)
जिल्ह्यात सौर कृषिपंप कार्यान्वित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 23, 2016 12:43 AM