३१ लोक ०७ के
मोहाडी : रुग्णालयात येणाऱ्या रुग्णांवर उपचार योग्य पद्धतीने करण्यात यावे, त्यांच्या समस्या तातडीने सोडविण्यात याव्यात, रुग्णालयाच्या काही समस्या असल्यास त्याबाबत वरिष्ठांना व मला कळविण्यात यावे, मी स्वतः वरिष्ठांशी बोलून समस्या सोडविण्याचा प्रयत्न करीन, असे निर्देश आमदार राजूभाऊ कारेमोरे यांनी वैद्यकीय अधीक्षक व डॉक्टरांना दिले.
रुग्णालय सल्लागार समितीची बैठक ग्रामीण रुग्णालय मोहाडी येथे आमदार राजूभाऊ कारेमोरे यांच्या अध्यक्षतेखाली सोमवारी घेण्यात आली. यावेळी त्यांनी उपरोक्त निर्देश दिले. मोहाडीच्या ग्रामीण रुग्णालयात अनेक प्रकारच्या समस्या असल्याचे बैठकीत समितीच्या निदर्शनास आले. या समस्यांवर बैठकीत चर्चा करण्यात येऊन समस्या कशाप्रकारे सोडविण्यात येतील, यावर विचारविमर्श करण्यात आला. शवविच्छेदनगृहाची अवस्था, पावसाळ्यात छतातून गळणारे पाणी, औषधी, स्वच्छता, एक्स-रे मशीन, रक्त तपासणी कक्ष व बंद असलेले यंत्र यावरसुद्धा चर्चा करण्यात आली. बैठकीला सल्लागार समितीचे सदस्य कृष्ण कुमार शुक्ला, प्रतिभा राखडे, पुरुषोत्तम पात्रे, धर्मराज तिवडे, शकील आंबागडे, सिराज शेख, नरेंद्र निमकर, श्याम कांबळे, नरेश ईश्वरकर, यशवंत थोटे, अनिल काळे आदी उपस्थित होते.
बॉक्स
अनेक उपकरणांचा तुटवडा
एक्स-रे मशीनसाठी स्टॅबिलायझरची आवश्यकता आहे, शवविच्छेदनगृह फार जुना व मोडकळीस आले असल्यामुळे नवीन बांधकाम करणे आवश्यक आहे, गरोदर महिला व प्रसूती वॉर्डात हृदयाचे ठोके मोजणाऱ्या फिटर मॉनिटरची आवश्यकता आहे, लॅयब्रोटरीमध्ये सीबीसी मशीन, बायो केमेस्ट्री एनालायजरसह काही उपकरणांची आवश्यकता आहे. या उपकरणांच्या पूर्ततेसाठी शल्य चिकित्सक भंडारा यांच्याकडे मागणी करण्याचे निर्देश आ. कारेमोरे यांनी बैठकीत दिले.