लाखनी (भंडारा) : शंकरपट पाहण्यासाठी सासूरवाडीला आलेल्या जावयाला रस्ता ओलांडताना अज्ञात वाहनाने धडक दिल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. ही घटना राष्ट्रीय महामार्गावार तालुक्यातील पिंपळगाव (सडक) येथे शनिवारी सकाळी ७:३० वाजताच्या सुमारास घडली. धडक एवढी जबरदस्त होती की, मृतकाला १५ फूट उंच उडवून दूरपर्यंत फरफटत नेले. यामुळे संतप्त नागरिकांनी अर्धा तास रास्तारोको केला.
रवींद्र श्रावण रामटेके (५७, रा. दिघोरी - नानोरी, ता. लाखनी) असे मृताचे नाव आहे. पिंपळगाव येथे दोन दिवसांचा शंकरपट आयोजित करण्यात आला होता. शुक्रवारी रवींद्र आपली सासूरवाडी पिंपळगाव टोली येथे साळा कृष्णा परसराम मेश्राम यांच्याकडे आला होता. दिवसभर शंकरपटाचा आनंद घेल्यानंतर रात्री साळ्याकडे मुक्काम केला. गावी जाण्यासाठी शनिवारी सकाळी रवींद्र निघाला. राष्ट्रीय महामार्ग ओलांडताना सकाळी ७:३० वाजता भरधाव आलेल्या वाहनाने त्यांना धडक दिली.
धडक एवढी भीषण होती की रवींद्र १५ फूट उंच उडाले आणि लांब अंतरापर्यंत वाहनासोबत फरफटत गेले. गंभीर दुखापत होऊन त्यांचा जागीच मृत्यू झाला. या घटनेची माहिती होताच गावातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. मात्र, तोपर्यंत वाहन पसार झाले होते. अपघातस्थळी रक्ताचा सडा पडला होता. या अपघाताने संतप्त झालेल्या नागरिकांनी राष्ट्रीय महामार्गावर चक्काजाम सुरू केला. लाखनी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत नागरिकांची समजूत काढली. तोपर्यंत अर्धा तास महामार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती. पाेलिसांनी पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी रवाना केला. रवींद्रच्या मागे पत्नी, दोन मुली व एक मुलगा आहे. या अपघाताची माहिती दिघोरी येथे होताच अनेकांनी पिंपळगाव येथे धाव घेतली.
रस्ता दुभाजकाच्या अभावाने अपघात वाढले
राष्ट्रीय महामार्गावर पिंपळगाव टोली येथे अनेक वर्षांपासून रस्ता दुभाजकाची मागणी आहे. दुभाजक नसल्याने सहा महिन्यांत १० अपघात होऊन १० जणांना आपले प्राण गमवावे लागले. माजी पंचायत समिती सदस्य पंकज श्यामकुंवर यांनी दुभाजकाचा प्रश्न मार्गी लावला होता. अपघातानंतर जनतेचा रोष वाढल्याने अर्धा तास वाहतूक बंद होती. अपघाताची नोंद लाखनी ठाण्यात करण्यात आली असून, तपास ठाणेदार मिलिंद तायडे करीत आहेत.