रंजित चिंचखेडेलाेकमत न्यूज नेटवर्कचुल्हाड (सिहोरा) : महत्त्वाकांक्षी सोंड्याटोला उपसा सिंचन प्रकल्पातील पंपगृहांचे बाबतीत सातत्याने दुर्लक्ष करीत असणाऱ्या निविदा कंत्राटदार प्रकाश मेश्राम यांना काळ्या यादीत घालण्यात येणार असल्याची माहिती मिळाली आहे. त्यांच्या विरोधात वारंवार वाढत्या तक्रारी असल्याने जलसंपदा विभागाकडे माहिती देण्यात आली आहे. यामुळे कंत्राटचे बचाव करण्यासाठी मेश्राम हे मंत्रालयात घिरटे घालत असल्याचे सांगण्यात येत आहे. पुन्हा या कंत्राटदाराला पंपगृहांचे कंत्राट मिळणार नाही. याकरिता पाटबंधारे विभागाचे प्रयत्न सुरू असल्याची माहिती नाव न प्रकाशित करण्याचे अटीवर एका अधिकाऱ्याने ‘लोकमत’ला सांगितले. ऐन पाणी उपसा करण्याचे हंगामात पंप बंद ठेवण्यात येत आहेत. ६ पंप नादुरुस्त असताना गत तीन वर्षांपासून नागपुरातून परत आणले जात नाहीत. पंप दुरुस्ती, देखभाल आणि पंपगृहांचे कंत्राट प्रकाश मेश्राम यांना देण्यात आले आहेत. कंत्राटदार नागपूरहून सोंड्याटोला उपसा सिंचन प्रकल्प आणि गोंदिया जिल्ह्यातील धापेवाडा उपसा सिंचन प्रकल्पावर नियंत्रण ठेवत आहेत. एकाच कंत्राटदाराला दोन्ही प्रकल्पाचे कंत्राट दिले जात आहेत. प्रकल्प स्थळात ९ पैकी फक्त ३ पंप उपलब्ध असल्याचे वरिष्ठ अधिकाऱ्यांना दिसून आले आहे. पंप आणि प्रकल्पाची अवस्था पाहून अधिकारी संतापले आहेत. अस्थाई कामगारांचे तीन वर्षांपासून नियमित वेतन देण्यात येत नसल्याने वारंवार पंप बंद करण्यात येत आहेत. अस्थाई कामगार संप पुकारत आहेत. अस्थाई कामगारांना वेतन देण्याची जबाबदारी निविदा कंत्राटदाराची आहे. कंत्राटदार कामगारांना गाजर दाखवित आहे. लोकमतने आज रविवारी वेतनाअभावी सोंड्याटोला सिंचन प्रकल्पातून उपसा बंद या आशयाचे वृत्त प्रकाशित केले. शाखा अभियंता लाड व अन्य वरिष्ठ अधिकारी खडबडून जागे झाले आहेत. नागपूरहून सकाळीच निविदा कंत्राटदार प्रकल्प स्थळात पोहोचले आहे. पाठबंधारे विभागाचे अधिकाऱ्यांनी कंत्राटदाराला खडसावले आहे. पंप दुरुस्त करीत नसल्याचे चौकशीत निदर्शनास आले आहे.
काळ्या यादीत घालणार- प्रकल्पातील पंप व पंपगृहांचे कामाचे कंत्राट निविदा कंत्राटदार प्रकाश मेश्राम यांना पुन्हा व कधीही देण्यात येणार नाही. याकरिता काळ्या यादीत घालण्यासाठी प्रयत्न सुरू करण्यात आले आहे. पुन्हा कंत्राट प्राप्त करण्यासाठी कंत्राटदाराने मंत्रालयात घिरट्या सुरू केलेल्या आहेत. नवीन कंत्राटदाराला कंत्राट देण्यात यावे, असे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.