रंजित चिंचखेडेलोकमत न्यूज नेटवर्कचुल्हाड (सिहोरा ) : तुमसर तालुक्यातील महत्त्वाकांक्षी सोंड्याटोला सिंचन प्रकल्पात चार पंप नादुरुस्त असल्याने पाण्याचा उपसा अडचणीत आला आहे. उर्वरित सुरू असणारे पाच पंप सलाईनवर असल्याने कोणत्याही क्षणी पाण्याचा उपसा थांबण्याची शक्यता आहे. निविदा कंत्राटदार प्रकाश मेश्राम यांनी पंपगृहाकडे दुर्लक्ष केल्याने संकट कोसळले आहे. पंपाच्या देखभाल व दुरुस्तीकडे दुर्लक्ष करण्यात आल्याचा फटका ११० कोटी रुपयांच्या खर्चाच्या प्रकल्पाला बसला असून प्रकल्पच बंद होण्याच्या मार्गावर आला आहे. बावनथडी नदीच्या पात्रातून पाणी उपसा करणाऱ्या महत्त्वाकांक्षी सोंड्याटोला सिंचन प्रकल्पात नवे संकट निर्माण झाले आहे. नऊ पंप असणाऱ्या या प्रकल्पात चार पंप नादुरुस्त आहेत. या नादुरुस्त पंपाचे साहित्य बेपत्ता झाले आहेत. तीन वर्षांपासून निविदा कंत्राटदाराने नादुरुस्त पंप प्रकल्प स्थळात आणले नाहीत. नागपुरात दुरुस्तीसाठी देण्यात आले असल्याची दिशाभूल माहिती सांगत आहेत. जे पंप दुरुस्तीकरिता जातात, ते पंप कधी परतले नाहीत. यामुळे प्रकल्पस्थळात सध्या स्थित पाच पंपांनी पाण्याचा उपसा करण्यात येत आहे. पाणी उपसा करणारे पाच पंप सलाईनवर आहेत. पाणी उपसा करणारे पाचही पंप कोणत्याही क्षणात बंद करण्याची वेळ आली आहे. यामुळे नदीपात्रातून पाण्याचा उपसा थांबणार आहे. निविदा कंत्राटदाराच्या बेजबाबदारपणामुळे प्रकल्प स्थळात संकट ओढवले आहे. या प्रकल्पात अनेक वर्षांपासून निविदा कंत्राटदाराने भेट दिली नाही. यंत्रणेतील अधिकाऱ्यांना हाताशी घेऊन नागपूर, भंडाऱ्यातून प्रकल्पाचा डोलारा सुरू ठेवण्यात आलेला आहे. नादुरुस्त पंपाचा थांगपत्ता नाही.
एकाच परिचालकाच्या खांद्यावर ओझे- पंपगृह संचालनासाठी तीन परिचालकांची नियुक्ती करण्याचे नियोजित आहे. परंतु या प्रकल्पात एकाच परिचालकाची नियुक्ती करण्यात आली आहे. रात्र आणि दिवस या एकाच परिचालकाला अल्प मानधनावर कामे करावी लागत आहेत. पंपगृह संचालनासाठी परिचालकांची नियुक्ती करण्याची जबाबदारी निविदा कंत्राटदार प्रकाश मेश्राम यांची आहे. परंतु पैशांची बचत करण्यासाठी उर्वरित पदे भरण्यात आले नाहीत. अधिकाऱ्यांच्या डोळ्यादेखत प्रकल्पस्थळात अनागोंदी कारभार सुरू असताना सारेच गहिवरल्यासारखे वागत आहेत. प्रकल्प स्थळातील पंपगृहाचे वाटोळे करणाऱ्या निविदा कंत्राटदाराचे कंत्राट रद्द करण्याची मागणी होत आहे.
चांदपूर जलाशयाचे पाणी सोडा- पंधरा दिवसांपासून पावसाने पाठ फिरविली असल्याने शेत शिवारात पाण्याचे संकट निर्माण झाले आहे. धान पिकांना पाण्याची गरज आहे. टेलवरील शेत शिवारात पाणीच नसल्याने खत व फवारणीची कामे अडली आहेत. चांदपूर जलाशयाचे पाणी सोडण्यासाठी जलद गतीने निर्णय घेतले पाहिजेत. तत्पूर्वी पाणी सोडताना पाटबंधारे विभागाच्या कर्मचाऱ्यांनी शेतशिवाराचे निरीक्षण केले पाहिजे. यामुळे पाण्याचा अपव्यय होणार नाही, अशी मागणी युवक काँग्रेसचे तालुकाध्यक्ष देवेंद्र मेश्राम यांनी केली आहे.