भंडारा : सोयाबीनला यंदा चांगला मिळत असल्याने अनेक यंदा टोकन पद्धतीने सोयाबीनची लागवड केली होती. त्यानंतर पीकही जोमदार आले. सोयाबीनला बाजारात असणारा दरही तब्बल दहा हजार किंबहुना जुलै महिन्यात तर ११ हजारांवर पोहोचला होता. त्यामुळे आपल्या हाती यावर्षी चांगला पैसा येणार म्हणून अनेक शेतकरी आनंदात होते. काहींनी गाडी घर बांधण्याची स्वप्नेही पाहिली. मात्र गेल्या काही दिवसांपासून सोयाबीनच्या दरात सातत्याने होत असलेल्या घसरणीमुळे बळीराजाच्या स्वप्नांचा चुराडा झाला आहे. सध्या सुरू असलेल्या संततधार पावसामुळे मराठवाडा, विदर्भात सोयाबीनचे मोठे नुकसान झाले आहे. तर दुसरीकडे शेतकऱ्यांचे नवीन सोयाबीन बाजारात येताच तब्बल पाच हजार आपली भावात घसरण झाली आहे. त्यामुळे पुन्हा शेतकऱ्यांना आता सोयाबीन दराची चिंता सतावू लागली आहे. एकीकडे खाद्य तेलाचे दर हे दिवसेंदिवस वाढत आहेत. एक किलो तेलाला तब्बल १७० रुपये मोजावे लागत आहेत तर दुसरीकडे आता सोयाबीनचे दर मात्र कमी झाल्याने पुन्हा एकदा व्यापारीच मालामाल होणार आहेत. यंत्रणेवर व्यापारीवर्गाचाच अंकुश असल्याचे यावरून दिसून येते. सरकारच यासाठी जबाबदार असून अनेक शेतकरी संघटना आता आंदोलनाच्या पावित्र्यात दिसत आहेत.
बॉक्स
खोऱ्याने पैसा ओतला आता काय करू
महिला मजूर लावून मी दोन एकरात सोयाबीन टोकन पद्धतीने लावली. पावसामुळे दुबार पेरणी केली. सोयाबीनचे पीकही चांगले एक नंबर आले होते. सोयाबीन किमान दोन एकरात २० ते २४ क्विंटलतरी होण्याचा मला अंदाज होता. मात्र सोयाबीन काढणीला येण्यापूर्वीच सोयाबीनचे दर पाच हजाराने घसरले आहेत. याला सरकारच जबाबदार आहे.
संजय आकरे, शेतकरी,खरबी नाका
कोट
माझ्याकडे पाच एकर सोयाबीन आहे. दरवर्षी सोयाबीन लावतो. परंतु यावर्षी सोयाबीनला चांगला भाव असल्याने सोयाबीनचे क्षेत्र वाढवले. एकीकडे पावसाने नुकसान तर दुसरीकडे सोयाबीनचे भाव उतरल्याने शेतकऱ्याचे नुकसान होत आहे. डिझेल,मजुरीही वाढल्याने शेतकऱ्यांच्या खर्चात वाढ झाली आहे. राज्य शासनाने नुकसान भरपाई द्यावी. विष्णूदास हटवार, शेतकरी चिखली.
बॉक्स विकण्याची घाई करू नका...
गतवर्षी सोयाबीनचे दर हे ऑक्टोबर, नोव्हेंबर महिन्यात जेमतेम साडेतीन ते चार हजाराच्या आसपास होते. मात्र त्यानंतर हळूहळू साडेचार हजार ते पाच हजारांचा टप्पा पार केला. त्यानंतर थेट मे,जूनमध्ये तर सोयाबीन दहा हजारांच्या पटीत वाढत गेले. राज्यात बुलडाणा, लातूर जिल्ह्यात तर ११ हजार ८०० रुपयांपर्यंत सोयाबीनचे भाव पोचले होते. त्यामुळे नवीन सोयाबीनची आवक जास्त असल्याने दर घटले आहेत. मात्र भविष्यात हे दर आणखी वाढण्याची शक्यता असल्याने शेतकऱ्यांनी सोयाबीन न विकलेलीच बरी असे जाणकारांचे मत आहे.
बॉक्स
एकरी चार हजारांचा खर्च
सोयाबीन पेरणी ते काढणीपर्यंत एकरी जवळपास ३५०० ते ४ हजार रुपये खर्च येतो. त्यामुळे शेतकऱ्यांना चांगला भाव मिळाला तरच चार पैसे त्यांच्या हातात राहणार आहेत. मात्र, सोयाबीन काढणीला आल्यानंतर अचानक भाव पाडल्याने शेतकऱ्यांचे नुकसान होईल, अशीच धोरणे शासनाकडून अनेक वर्षापासून राबवली जात असल्यानेच बळीराजाचे दिवस बदलत नाहीत.