तालुक्यात गतवर्षी खरीप हंगामांतर्गत २८ हजार ६९२ हेक्टर क्षेत्रात विविध पिकांची लागवड करण्यात आली होती. या अंतर्गत गतवर्षी २५ हजार ९८५ हेक्टर क्षेत्रात धानपिकाची लागवड करण्यात आली होती, तर २ हजार ७०७ हेक्टर क्षेत्रात अन्य पिकांची लागवड करण्यात आली होती.
तालुक्यातील बहुतांश क्षेत्रात कृषी वीज पंप तथा ईटियाडोह धरणांतर्गत सिंचन सुविधा उपलब्ध असल्याने तालुक्यातील बहुतांश शेतकऱ्यांद्वारा धानपिकाची लागवड केली जाते. त्यानुसार गतवर्षी केवळ ८२० हेक्टर क्षेत्रात आवत्या धानाची लागवड करण्यात आली होती. तर रोवणी अंतर्गत २ हजार ५२७ हेक्टर क्षेत्रात धानाच्या नर्सरीची लागवड करण्यात आली होती. यंदाच्या खरीप हंगामात तालुक्यातील शेतकऱ्यांद्वारा आत्तापर्यंत केवळ १ हजार ४३० हेक्टर क्षेत्रात धानपिकाची पेरणी करण्यात आली. त्यामध्ये आवत्या धानाची ९० हेक्टर क्षेत्रात तर रोवण्या धानाची १ हजार ३४० हेक्टर क्षेत्रात नर्सरीची पेरणी करण्यात आली आहे.
दरम्यान, तालुक्यात धान पिकाच्या तुलनेत अन्य पिकांची कमी क्षेत्रात पेरणी केली जाते. या पिकांमध्ये तूर या पिकाचे क्षेत्र अधिक असते. तर अन्य पिकांतर्गत सोयाबीन, तीळ, हळद व कापूस आदी पिकांची पेरणी केली जाते. गतवर्षी २ हजार ३१२ हेक्टर क्षेत्रात तूर पिकाची लागवड करण्यात आली होती, तर सोयाबीन ३४ हेक्टर, तीळ ८६ हेक्टर, हळद ९२ हेक्टर व कापूस २८ हेक्टर क्षेत्रात लागवड करण्यात आली होती.
यंदाच्या हंगामात अन्य पिकांतर्गत तूर, सोयाबीन, तीळ, हळद व कापूस आदी पिकांची केवळ ३४९ हेक्टर क्षेत्रात पेरणी करण्यात आली आहे. त्यानुसार गतवर्षीच्या खरीप हंगामाच्या तुलनेत यंदाच्या खरिपातील लागवडीखालील क्षेत्र खूप कमी असून, तालुक्यातील शेतकऱ्यांद्वारा सध्या विविध पिकांची लागवड सुरू आहे.
बॉक्स
कृषक ॲप डाऊनलोड करण्याचे आवाहन
धान पिकासह अन्य पिकांच्या पेरणी तसेच लागवडी अंतर्गत पिकांच्या उत्पादन वाढीसाठी शेतकऱ्यांद्वारा मोठ्या प्रमाणात रासायनिक खतांचा वापर केला जातो. त्यानुसार शेतकऱ्यांना मोठे आर्थिक नुकसान सहन करावे लागते. सदर स्थिती लक्षात घेत शासनाच्या कृषी विभागांतर्गत रासायनिक खतांचा कमी वापर करून शेती विषय विविध सल्ला व मार्गदर्शन करण्यासाठी कृषक ॲप तयार करण्यात आले आहे. त्या अंतर्गत शेतकऱ्यांना विविध पिकांच्या उत्पादनात मदत होणार असल्याचे सांगत सदर ॲप शेतकऱ्यांनी डाऊनलोड करण्याचे आवाहन तालुका कृषी अधिकारी दीपक पानपाटील यांनी केले आहे.