लाखांदूर : यंदाच्या खरिपात तालुक्यातील शेतकऱ्यांंनी आत्तापर्यंत ३,२८१.९० हेक्टर क्षेत्रात आवत्या धानासह अन्य विविध पिकांची पेरणी करण्यात आली असल्याची माहिती तालुका कृषी विभागांतर्गत देण्यात आली आहे.
मागील काही दिवसात तालुक्यातील विविध भागात समाधानकारक पाऊस पडल्याने शेतकऱ्यांद्वारे विविध पिकांची लागवड करण्यात गती दिसून आली. तालुक्यातील दोन विविध क्षेत्रात इटियाडोह बांध व गोसेखुर्द धरणाच्या डाव्या कालव्या अंतर्गत सिंचनाची सुविधा उपलब्ध केली जाते. तालुक्यातील सिंचन क्षेत्रांतर्गत बहुतेक शेतकऱ्यांकडून धान पिकाची रोवणी केली जाते. या रोवणी अंतर्गत तालुक्यातील शेतकऱ्यांद्वारे २,४९४.७० हेक्टर क्षेत्रात धान पऱ्ह्यांची लागवड करण्यात आली आहे.
सिंचन सुविधा उपलब्ध नसलेल्या भागात शेतकऱ्यांद्वारे ५०४ हेक्टर क्षेत्रात आवत्या धानाची लागवड करण्यात आली आहे. यंदाच्या खरीप हंगामात सिंचन सुविधा अंतर्गत तालुक्यातील शेतकऱ्यांचा आत्तापर्यंत २४६ हेक्टर क्षेत्रात धान पिकाची लागवड करण्यात आली तर सिंचनाची सुविधा नसलेल्या ५०४ हेक्टर क्षेत्रात धान पिकाची लागवड करण्यात आली आहे. एकूण मिळून तालुक्यात ७५० हेक्टर क्षेत्रात धान पिकाची लागवड करण्यात आली आहे. तालुक्यातील बहुतांश शेतकऱ्यांद्वारे सिंचन सुविधेअंतर्गत धान पिकाची शेती केली जात आहे. यंदाच्या खरीप हंगामात तालुक्यात आवत्या धानाच्या लागवडीखालील क्षेत्र कमी दिसून येत असून दरवर्षीप्रमाणे तालुक्यातील जवळपास २५ हजार हेक्टर क्षेत्रात धान पिकाची लागवड केली जाण्याची संभाव्यता व्यक्त केली जात आहे. तालुक्यातील धान पिकाचे प्रामुख्याने रोवणी केली जाते मात्र या पिकांसोबतच शेताच्या बांधासह अन्य क्षेत्रात तुरीची लागवड केली जाते. यंदाच्या खरीप हंगामात तालुक्यातील शेतकऱ्यांद्वारे जवळपास २,१८८.५० हेक्टर क्षेत्रात तुरीची लागवड करण्यात आली आहे.
बॉक्स
१२० हेक्टर क्षेत्रात तीळ व सोयाबीन
यंदा तालुक्यात १२४ हेक्टर क्षेत्रात तीळ व सोयाबीन पिकाची लागवड करण्यात आली आहे. यंदा करण्यात आलेल्या तूर व सोयाबीनचे लागवडीखालील क्षेत्र हे गतवर्षीच्या तुलनेत अधिक असल्याची माहिती देण्यात आली आहे. गतवर्षी तालुक्यात १२० हेक्टर क्षेत्रात तीळ व सोयाबीन पिकांची लागवड करण्यात आली होती. गतवर्षीच्या तुलनेत यंदा करण्यात आलेले तुरीचे लागवडीचे क्षेत्र कमी असल्याचे सांगितले जात आहे. गतवर्षी तालुक्यात २,३१२ हेक्टर क्षेत्रात तुरीची लागवड करण्यात आली होती. तालुक्यातील काही क्षेत्रात सिंचन सुविधा उपलब्ध नसल्याने व सोबतच पावसाचे पाणी शेतात मोठ्या प्रमाणात जमा होत नसल्याने काही शेतकऱ्यांद्वारे शेतात तीळ व सोयाबीन यासारख्या खाद्य तेल उपयोगी पिकांची लागवड केली जात आहे.