भंडारा : अनेक दिवसांपासून वसतीगृहाच्या समस्या प्रलंबित आहेत. त्या समस्या सोडविण्यासाठी राज्य शासनाने ६० कोटी रुपयांचा निधी राज्यातील जिल्हा प्रशासनाकडे पाठविला आहे. यात भंडारा जिल्ह्याला सहा कोटी रुपये मिळणार आहेत. यासह वसतिगृहाच्या समस्यांना नेहमी प्राधान्य देणार आहे, असे प्रतिपादन सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग मंत्री राजकुमार बडोले यांनी केले. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२५ व्या जयंतीवर्ष, क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त भंडारा जिल्हा मागासवर्गीय वसतीगृह संचालक मंडळाच्यावतीने आज, सामाजिक न्याय भवनात आयोजित सत्कार सोहळ्याप्रसंगी सत्काराला उत्तर देताना ते बोलत होते. अध्यक्षस्थानी वासुदेवराव गजभिये, तर अतिथी म्हणून आ. रामचंद्र अवसरे, जिल्हा परीषद उपाध्यक्ष राजेश डोंगरे, समाजकल्याण सभापती निलकंठ टेकाम, महिला बालकल्याण सभापती शुभांगी रहांगडाले, जि.प. सदस्य होमराज कापगते, टी.वी. गेडाम, म.दा. भोवते, जिल्हाधिकारी धीरजकुमार, समाजकल्याण विभागाचे सहायक आयुक्त देवसूदन धारगावे, जिल्हा परीषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यपालन अधिकारी भोरे, समाजकल्याण अधिकारी राठोड उपस्थित होते. तत्पुर्वी विद्यार्थ्यांनी स्वागत गितातून मान्यवरांचे स्वागत केले. त्यानंतर प्रा. शिलवंत मडामे यांनी 'ज्योतिबांच्या सावित्रीची किर्ती अजरामर' या सुमधूर गितातून क्रांतीज्योती सावित्रीआई फुले यांच्या आठवणींना उजाळा दिला. यावेळी सत्कारमुर्ती ना. राजकुमार बडोले यांचा चांदीचा रथ, शाल, पुष्पगुच्छ, संविधानाची प्रत देऊन सत्कार करण्यात आला. तसेच मंचावर उपस्थितांचा सत्कार करण्यात आला. ना. बडोले म्हणाले, चातुर्वर्णाचा इतिहास लक्षात घेतला तर तेव्हा मानवाला मानवासारखी वागणूक मिळत नव्हती, महिलांना स्वातंत्र्य नव्हते, त्या काळात रुढी, परंपराला झुगारुन अन्याय, हालअपेष्टा सहन करीत ज्योतिबांच्या पुढाकाराने सावित्रीआर्इंनी शिक्षणाची दारे उघडण्यासाठी लढा दिला. त्यांचे कार्य देशासाठी मोलाचे असून त्यांचे विचार आत्मसात करण्याची गरज आहे. आजही जातीपातीच्या विचारात बहुजन समाज गुरफटलेला आहे. जीवन उध्दारासाठी जातींमधील भेदाभेद दूर करुन एकत्रित येण्याची गरज आहे. प्रास्ताविक भाऊ गोस्वामी यांनी केले. सोहळ्यासाठी भंडारा जिल्हा मागासवर्गीय वसतीगृह संचालक मंडळाचे शैलेश मयूर, दिगांबर रामटेके, प्रमोद कान्हेकर, राजकुमार नंदेश्वर व पदाधिकाऱ्यांनी सहकार्य केले. (नगर प्रतिनिधी)वसतिगृह अधीक्षकांना वेतनश्रेणी लागू होणारवसतिगृह अधीक्षक व कर्मचारी तुटपुंज्या मानधनावर सेवा करीत आहेत. त्यांचे मानधन वाढविण्यासाठी शासनस्तरावर प्रयत्न सुरु झाले आहेत. लवकरच त्यांना वाढीव मानधन मिळेल. यासह अधीक्षकांच्या वेतनश्रेणीविषयी सकारात्मक दृष्टिकोन असून त्याची प्रक्रिया युध्दस्तरावर सुरु असल्याची माहिती ना. राजकुमार बडोले यांनी दिली.सामाजिक न्यायमंत्र्यांचे जिल्हाधिकाऱ्यांना निर्देशसामाजिक न्याय मंत्र्यांचे भाषण अंतिम टप्प्यात असताना त्यांनी भटक्या विमुक्त जाती, जमाती प्रवर्गाच्या समस्या सोडविण्याचे निर्देश जिल्हाधिकारी धीरजकुमार यांना दिले. ना. बडोले म्हणाले, भटक्या विमुक्त जाती, जमाती प्रवर्गांना विकासाच्या प्रवाहात आणण्यासाठी प्रयत्न करावे. त्यांना जात प्रमाणपत्र, जात वैधताप्रमाणत्र मिळाल्यास मुलांना शिक्षणासाठी मदत होईल. त्यांच्यासाठी कौशल्य विकास कार्यक्रम घेण्यात यावे. यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहतीसाठी प्रयत्न करा. या माध्यमातून त्या प्रवर्गातील समस्या मार्गी लागल्यास सोईचे होईल.
वसतिगृहांच्या समस्यांना विशेष प्राधान्य
By admin | Published: January 04, 2016 12:28 AM