महिलांना मार्गदर्शन : लसीकरण, पोषण आहाराबाबत केली जनजागृतीभंडारा : राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत जिल्हा रुग्णालयात पोषण पुर्नवसन केंद्रातील कुपोषित बालकांसाठी वार्ड तयार करण्यात आला आहे. या पोषण पुर्नवसन केंद्राला एक वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमाचे उद्घाटन जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. रविशेखर धकाते यांच्या हस्ते दिप प्रल्वलन करुन झाले.यावेळी डॉ. धकाते यांनी कुपोषणाचे कारणे, कुपोषण टाळण्यासाठी उपाययोजना व नियंत्रण, स्वच्छतेचे महत्व, लहान बालकांची आहाराबाबत काळजी घेणे तसेच वेळोवेळी लसीकरण करण्याबाबत माहिती दिली. जेव्हा जास्तीत जास्त लाभार्थी या केंद्राचा लाभ घेवून आपला समाज कुपोषण मुक्त कसा होईल यासाठी पोषण पुर्नवसन केंद्रात उपचार घेतलेल्या कुपोषित बालकांच्या मातांनी गावातील इतर बालकांच्या परिवारास ही माहिती देवून समाज कुपोषण मुक्त करण्यास सहकार्य करावे, असेही ते म्हणाले. यावेळी अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्क डॉ. सुनिता बढे, डॉ. पियुष गोयल, डॉ. सुचिता वाघमारे, डॉ. पराग डहाके उपस्थित होते.या पोषण पुर्नवसन केंद्रामध्ये कुपोषित बालक, डॉक्टर्स, अशा अंगणवाडी सेविका, ए.एन.एम. तसेच ओ.पी.डी. पेडियाट्रिक वार्ड तसेच स्व:ता कुपोषित बालकांचे पालक भरती होवून या शासकिय सेवेचा लाभ घेत असतात. जिल्हा रुग्णालयातील पोषण पुर्नवसन केंद्रामध्ये कुपोषित बालकांसाठी वार्ड स्थापित असून ट्रेन आहार तज्ञ व बालरोग तज्ञ आहेत जर बालक कुपोषित असेल तर बालक व माता यांना १४ दिवस भरती करुन घेतात. मातांना १४ दिवस दोन वेळचे जेवण, दोन वेळ चहा, नास्ता व राहण्याची सोय आहे. बालकांच्या आहारावर विशेष भर आणि आवश्यक त्या तपासण्या व उपचार केल्या जातो. मातांना ५० रुपये प्रति दिवस या प्रमाणे १४ दिवसांची बुडित मजुरी दिली जाते. बालकाला सट्टी दिल्यानंतर पुढील दोन महिने १५-१५ दिवसात आढावा घेण्यास बोलाविले जाते. समुपदेशक व आहार तज्ञ १४ दिवसामध्ये मातांना वैयक्तिक तसेच परिसर स्वच्छता, लसीकरण, लहान बालकांची आहाराची काळजी , कुपोषणाचे कारणे व त्यावर उपाय, स्वयंपाक करण्याच्या योग्य पध्दती, घरी उपलब्ध असलेल्या अन्न पदाथार्तून पोष्टीक पाककृती बनविणे, बालकांच्या बुध्दीला चालना मिळण्यासाठी टाकाऊ वस्तू मधून खेळणे बनविणे याबाबत महत्व समजाविले जाते. कार्यक्रमाचे संचालन तसेच आभार आहार तज्ञ वैशाली ठाकरे यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरीता सामान्य रुग्णालयातील आहारतज्ञ विनीता चकोले, डॉक्टर्स, अधिसेविका, अधिपरिचारीका, कर्मचारी, तसेच त्यांच्या चमुने परिश्रम घेतले. (नगर प्रतिनिधी)
पोषण पुर्नवसन केंद्राच्या वर्षपूर्तीनिमित्त विशेष कार्यक्रम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 07, 2017 12:37 AM