हा रस्ता तीन वर्षांपूर्वी मुख्यमंत्री ग्राम सडक योजने अंतर्गत तयार करण्यात आला होता. मात्र अवजड वाहतुकीने रस्त्याची चाळण झाली. पालांदूर परिसरात नेरला उपसासिंचन कार्यावर बांधकाम सुरू आहे. या कालव्यावर लागणारे खनिज साहित्य ने-आण करण्याकरिता टिप्परची मदत घेतली जात आहे. सुमारे ४० टनापर्यंत वजनाचे टिप्पर धावत असल्याने हा रस्ता फुटलेला होता. अपघातसुद्धा या रस्त्यावर घडलेले आहेत. मांगलीचे सरपंच प्रशांत मासुरकर यांनी हा प्रश्न शासन दरबारी मांडला. मात्र मार्ग न निघाल्याने ‘लोकमत’ने वृत्त प्रकाशित केले. त्यानंतर बांधकाम विभागाने भेट देत रस्त्याची पाहणी केली. तीन वर्षांपूर्वी बांधकाम करणाऱ्या कंत्राटदाराकडून दुरुस्तीचे काम सुरू केलेले आहे.
सध्या किटाळी ते मांगली रस्त्याच्या दुरुस्तीचे काम आटोपलेले आहे. मांगली ते पेंढरी या रस्त्याचे दुरुस्तीचे काम सुरू आहे. परंतु सदर रस्त्यावर अवजड टिप्पर भरधाव धावत असल्याने रस्त्याची अवस्था किती दिवस टिकेल हे सांगणे कठीण आहे. यानंतरही रस्ता फुटल्यास पुढचे काम डी.व्ही. कंपनी करेल, असे बांधकाम विभागाचे कनिष्ठ अभियंता एस. एम. हरकंडे यांनी सांगितले. तर किटाडी ते मांगली या रस्त्याप्रमाणेच मांगली ते पेंढरी रस्त्याचे काम गुणवत्तापूर्ण व्हावे, अशी मागणी मांगलीचे सरपंच प्रशांत मासुरकर यांनी केली आहे.