भंडारा : भेल भारतीय हेवी इलेक्ट्रीकल्स लि. चे कामाला गती मिळण्यात यावी, अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेना शाखा लाखनीच्या पदाधिकाऱ्यांनी तहसीलदारांमार्फत मुख्यमंत्र्यांना पाठविलेल्या निवेदनातून केली आहे.विदर्भाच्या महत्वाकांक्षी भेल व सौर उर्जा प्रकल्पाचे १४ मे २०१३ रोजी तत्कालीन महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, माजी केंद्रीय कृषी मंत्री शरदचंद्र पवार, माजी अवजड उद्योगमंत्री प्रफुल पटेल यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये आणि हजारो लोकांच्या साक्षीने साकोली तालुक्यातील मुंडीपार सडक येथील भेल प्रकल्पाचे थाटामाटात भूमिपूजन पार पडले. येथील राज्यकर्त्यांनी प्रकल्प दोन वर्षात पूर्ण करू आणि हजारो बेरोजगारांना रोजगार देण्यात येईल, अशी हमखास ग्वाही दिली. परंतू या विदर्भाचा महत्वाकांक्षी भेल व सौरउर्जा प्रकल्प येथील उदासीन लोक प्रतिनिधींच्या विकासात्मक मानसिकतेच्या अभावामुळे प्रकल्पाचे काम मंदगतीने सुरू आहे. त्यामुळे प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष हजारो बेरोजगार युवकांना रोजगार मिळण्याच्या अपेक्षा भंग होण्याच्या मार्गावर आहेत.आता सत्तापालट झाली असून विदर्भातील १५ ते २० हजार बेरोजगार युवकांना रोजगार मिळणार होते. परंतु ते कामापासून वंचित झाले, यामध्ये कुणाचा दोष आहे. ज्या शेतकऱ्यांनी या प्रकल्पास स्वत:च्या जमिनी दिल्या त्यांना दीड वर्ष लोटुनही प्रकल्पग्रस्त प्रमाणपत्र सुद्धा अजुनही देण्यात आलेले नाही. याचे कारण येथील लोकप्रतिनिधींकडे येथील विकासाचे कार्य न करता, विकासात्मक मानसीकतेचा अभाव त्यांच्याकडे आहे, असेच म्हणावे लागेल. या महात्वाकांक्षी भेल प्रकल्पाचे काम जलद गतीने करून येथील बेरोजगारांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी मनसेचे उपाध्यक्ष भरत वंजारी यांनी केली आहे.येत्या काही दिवसाच्या काळात भेल प्रकल्पाचे काम जलद गतीने करून येथील बेरोजगारांना रोजगार उपलब्ध झाले नाही तर महाराष्ट्र नवनिर्माण सेना मनसेच्या वतीने भव्य आंदोलन उभारण्यात येईल, असा इशारा निवेदनातून दिला आहे. (नगर प्रतिनिधी)
भेलच्या कामाला गती द्या
By admin | Published: December 18, 2014 10:50 PM