चंदन मोटघरेलाेकमत न्यूज नेटवर्कलाखनी : लाखनी - रेंगेपार - चंद्रपूर रस्ता बांधकामासाठी कोट्यवधी रुपये खर्च करण्यात आले. मात्र, चिखलाबोडीच्या पुढे रस्ता बांधकाम रखडल्याने अनेक प्रवासांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. या रस्त्याने सुरक्षित प्रवास जर होऊ शकत नसेल तर हा रस्ता कोणत्या उपयोगाचा, असा प्रश्न आता जनतेकडून विचारला जाऊ लागला आहे. शिवालय कंपनीच्या माध्यमातून लाखनी, सोमलवाडा, रेंगेपार, चंद्रपूर, कोका अभयारण्य आणि पुढे खापामार्गे रामटेक असा हा रस्ता तयार करण्यात आला. शासनाचे कोट्यवधी रुपये या रस्त्यासाठी खर्च झाले. हा रस्ता तयार करण्यापूर्वी पेट्रोल, पैसा व वेळ वाचेल असा प्रचार प्रसार केला होता. या रस्त्यात शेतकऱ्यांच्या जमिनी गेल्या. वडसा, ब्रह्मपुरी, लाखनी, लाखांदूर, पवनी येथून येणाऱ्यांना कमी वेळात कमी खर्चात सुरक्षित खापा, रामटेकमार्गे पुढे जाता येईल, असे खोटे स्वप्न दाखविण्यात आले. यात कोट्यवधी रुपयांचा चुराडा झाला. अनेक दिवस या रस्त्याचे काम चालले. जेव्हा काम सुरू होते तेव्हा या रस्त्यावरील गावातील लोकांनी किती यातना भोगल्या त्यांचे त्यांनाच माहीत. ते त्यांनी सहन केले. मात्र, या रस्त्यावर कोट्यवधी खर्च करून साध्य काय झाले, याचे उत्तर कुणाजवळही नाही. शासनाचे रुपये खर्च झाले, कंपनीची मात्र चांदी झाली. लाखनीवरून पुढे गेल्यावर चिखलाबोडी ते चंद्रपूर केवळ एक किलोमीटर रस्ता तसाच ठेवून शिवालय कंपनी कुठे गेली माहीत नाही. एवढा हा रस्ता असा का ठेवला, त्याचे उत्तरही मिळत नाही. लाखनीमार्गे जवळचा रस्ता म्हणून प्रवासी या मार्गाने निघतात. चिखलाबोडी गावाच्या पुढे जातात आणि त्यांना दिसतो चिखल मातीचा भयानक रस्ता. इतक्या दूर गेल्यानंतर पुन्हा त्यांना लाखनीला परत यावे लागते. त्यांना जो मनस्ताप सहन करावा लागतो. दररोज दहा ते बारा चार चाकी तिथून परत जात आहेत. इतका लांबचा प्रवास करून चिखलाबडी ते चंद्रपूर केवळ एक किलोमीटर; परंतु एवढाच रस्ता भयानक आहे. चंद्रपूरच्या अगदी जवळ जाऊन परत यावे लागते म्हणून तक्रारी केल्या. सर्व तक्रारी दुर्लक्षित झाल्या. आजही लोकांची फजिती होतच आहे. चार चाकी गाड्या चिखलात फसत आहेत. जवळपासच्या गावातील ट्रॅक्टर नेऊन गाड्या ओढून काढाव्या लागत आहेत.चार चाकी वाहन चालकांनी या रस्त्याने अभयारण्य कोकामार्गे जाऊ नये, असा बोर्ड तरी निदान शासनाने लावावा, जेणेकरून लोकांची फजिती होणार नाही, अशी मागणी आता जनतेकडून होत आहे. याकडे कंपनीने लक्ष देण्याची गरज आहे.