पहिल्या टप्प्यात कोरोना योद्ध्यांच्या लसीकरणानंतर आता दुसऱ्या टप्प्यात ६० वर्षांवरील ज्येष्ठ नागरिक आणि ४५ ते ५९ वर्षे वयोगटातील मधुमेह व रक्तदाबग्रस्त रुग्णांसाठी कोरोना लसीकरण मोहीम राबविण्यात येत आहे. या मोहिमेंतर्गत शुक्रवारपर्यंत २९८ नागरिकांनी कोरोना लसीकरणाचा लाभ घेतला.
त्याचप्रमाणे कोरोना विषाणूंचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेऊन लाखांदूरच्या तहसीलदारांनी व्यापक जनसंपर्कात येत असलेल्या गावातील सर्व व्यावसायिकांची कोरोना चाचणी करून घेण्याचे आदेश प्रत्येक ग्रामपंचायतला दिले होते. त्यानुसार येथील व्यावसायिकांची कोरोना चाचणीही घेण्यात येत आहे. शुक्रवारपर्यंत विरली (बु.) आणि ईटान येथील एकूण २१८ व्यावसायिकांची कोरोना चाचणी घेण्यात आली असून सर्व चाचण्या नकारात्मक आल्याचे वैद्यकीय अधिकारी विवेक बन्सोड यांनी सांगितले.
या लसीकरण मोहिमेच्या यशस्वितेसाठी विरली (बु.) उपकेंद्राचे वैद्यकीय अधिकारी विवेक बन्सोड, आरोग्य सेविका सुषमा बांगळकर, साठवने, सीएचओ किरण डोरले, बनकर, आरोग्य सेवक गिऱ्हेपुंजे, आशा स्वयंसेविका ऊर्मिला कोरे, निशा जांगळे, वर्षा ढोरे आदी अथक परिश्रम घेत आहेत.