सालेकसा : वाढत्या कोरोना संसर्गाचा वेग पाहता राज्य सरकारने संपूर्ण वीकेंड लॉकडाऊन जाहीर केला असून, शनिवारी पहिल्याच दिवशी संपूर्ण सालेकसा शहरात बाजारपेठ कडकडीत बंद ठेवण्यात आली.
सर्व व्यापारीवर्गाने प्रतिसाद दिला. देशात यंदा कोरोनाची दुसरी लाट फारच भयावह असून, त्यात महाराष्ट्र राज्यात देशातील निम्म्यापेक्षा जास्त लोकांना दररोज कोरोनाची लागण होत आहे. सुरुवातीला काही मोजक्या मोठ्या शहरात कोरोनाचा जास्त प्रभाव होता. परंतु आता कोरोनाचा संसर्ग मोठ्या शहरातून छोट्या शहराकडे व ग्रामीण भागात पसरत चालला आहे. अशात सर्वसामान्य लोकांचे जीव धोक्यात आलेले दिसत आहेत. लोक मृत्युमुखी पडत आहेत. ही बाब लक्षात घेता शासनाने सध्या संपूर्ण वीकेंड लॉकडाऊनचा निर्णय घेतला. त्यानुसार शनिवारी सकाळपासून सर्वच दुकाने व प्रतिष्ठान बंद ठेवण्यात आली. सकाळी काही किराणा व्यावसायिकांनी दुकान उघडली होती. त्यापाठोपाठ इतर दुकानदारांनीसुद्धा दुकान उघडण्याचा प्रयत्न केला. परंतु ही माहिती मिळताच नगर प्रशासनाने सर्वांना आपली दुकाने बंद करून ठेवण्यास भाग पाडले.
ग्रामीण भागात दुकाने सुरूच
nसंपूर्ण राज्यात वीकेंड लाॅकडाऊन सुरू झाला असला तरी तालुका मुख्यालयासह काही प्रमुख गावांमध्ये दुकाने बंद ठेवण्यात आली. परंतु खेडे गावात वीकेंड लॉकडाऊनचा काहीही प्रभाव पडला नसून अनेक गावांमध्ये दुकाने सुरू ठेवण्यात आली. त्यांना कोरोना संसर्गाशी काही देणे-घेणे नाही असेच दिसून आले.