सभा : सुभाष गांगरेड्डीवार यांचे आवाहन मोहाडी : शालेय स्तरावर क्रीडा संस्कृतीचे संवर्धन व संस्कार क्रीडा शिक्षकच करू शकतो. ग्रामीण मुलांना क्रीडा क्षेत्रात उच्च पातळीवर नेण्याची क्षमता क्रीडा शिक्षकात आहे. पण, अलिकडे विविध समस्यांना क्रीडा शिक्षक सामोरे जात आहेत. स्थानिक व प्रशासकीय संकटावर मात करून क्रीडा शिक्षकांनी नैराश्यातून बाहेर पडावे. क्रीडा क्षेत्रात पोषक वातावरण निर्माण करण्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न करण्यात यावे, असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी सुभाष गांगरेड्डीवार यांनी केले.जिल्हा परिषद हायस्कूल मोहाडी येथे क्रीडा शिक्षकांची सभा आयोजित करण्यात आली होती. त्या सभेत क्रीडा शिक्षकांना मार्गदर्शन करताना ते बोलत होते. अध्यक्षस्थानी मुख्याध्यापिका क्रीडा अधिकारी दिलीप इटनकर, मनोज पंधराम, महात्मा ज्योतिबा फुले हायस्कूलचे मुख्याध्यापक राजकुमार बांते, तालुका संयाजेक एन.एम. बोळणे, धनंजय बिरणवार, विनायक वाघाये यांची उपस्थिती होती. यावेळी शालेय तालुका क्रीडा स्पर्धचे सभेत नियोजन करण्यात आले. विविध खेळाबाबत व स्पर्धेसंबंधात माहिती क्रीडा अधिकारी मनोज पंधराम यांनी दिली. जिल्हा क्रीडा अधिकारी भंडाराकडून यावर्षी शाळांना क्रीडा साहित्यांचा पुरवठा केला जाणार आहे. त्यासाठी मुख्याध्यापकांनी प्रस्ताव क्रीडा अधिकारी भंडारा यांचेकडे पाठवावेत. तसेच जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाकडून देण्यात येणाऱ्या योजनांची माहिती क्रीडा शिक्षकांना देण्यात आली. यावर्षी शालेय क्रीडा प्रकारात शालेयस्तरावर दहा खेळांचा समावेश करण्यात आल्याचे तालुका क्रीडा संयोजक नामदेव बोळणे यांनी सांगितले. यात फुटबॉल, व्हॉलीबॉल, कबड्डी, कुस्ती, क्रिकेट, बुद्धीबळ, तायक्वांदो, कराटे, खो-खो व मैदानी खेळाचा समावेश करण्यात आला आहे. सभेचे संचालन नामदेव बोळणे यांनी तर आभार प्रदर्शन विनायक वाघाये यांनी केले. (तालुका प्रतिनिधी)
क्रीडा शिक्षकांनी नैराश्यतेतून बाहेर पडावे
By admin | Published: July 30, 2015 12:47 AM