नरव्हा येथील प्रकार : संकरीत बायर कंपनीचे ६१२९ जातीचे वाणमुखरू बागडे पालांदूरशीर्षक वाचून अचंबित झाल्यासारखे वाटते, पण हे सत्य आहे. लाखनी तालुक्यातील चुलबंदच्या खोऱ्यात नरव्हा येथे उभ्या धानाच्या लोंबीलाच अंकुर फुटले आहे. त्यामुळे परिसरात आश्चर्य व्यक्त होत असून अभ्यासूंची पुरूषोत्तम उपरीकर यांच्या शेतात गर्दी होत आहे.शक्यतो, धान परिपक्व झाल्यानंतर व जमिनीत ओलावा असल्यास धानाला अंकुर येतो. मात्र नरव्हा येथे धान कापणीला आणखी १५ दिवसाचा कालावधी शिल्लक आहे. धान उभाच असून लोंबी अपरिपक्व आहे. अशा स्थितीत धानाला अंकुर फुटल्याने परिसरातील शेतकऱ्यांना याचे आश्चर्य वाटत आहे. हाता-तोंडाशी आलेले पीक वाया जाताना पाहून शेतकरी घाबरला आहे. प्रभावित शेतकऱ्याचे नाव पुरूषोत्तम उपरीकर यांनी ‘ब्रायर’ कंपनीचे संकरीत वाण ६१२९ ची यावर्षी लागवड केली. या वाणाची लागवड केल्यानंतर प्रारंभीपासून आतापर्यंत चांगली वाढ झाली. परंतु उभ्या धानपिकाला अंकुर फुटल्याने शेतकऱ्यांमध्ये नैराश्य पसरले आहे. यासंदर्भात उपरीकर यांनी सांगितलेल्या कंपनीच्या प्रतिनिधीशी संपर्क साधला असता, वरिष्ठ अधिकारी मुंबईला असल्यामुळे गुरूवारला शेतावर येऊन हा प्रकार नेमका कशामुळे घडला, याचा अभ्यास करून निष्कर्ष काढता येईल, असे सांगितले. आता या कंपनीचे अधिकारी येऊन कोणती पाहणी करतील आणि निर्णय देतील याकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे.बायर कंपनीचे ८१२९ संकरीत वाण कृषी केंद्राकडून पक्के बिल घेऊन खरेदी केले आहे. धान अंतिम टप्प्याकडे असून दीड एकरात लागवड केली आहे. सर्व खर्च आटोपून आज धान लोंबीतच अंकुरल्याने नुकसान झाले आहे. कंपनीने नुकसानभरपाई द्यावी.-पुरूषोत्तम उपरीकर, प्रभावित शेतकरी नरव्हा.बियाणातील सदोषता व पावसाळी वातावरणामुळे धान लोंबीतच अंकुरले असावे. लोंबी पूर्णपणे हिरवी असताना कापणी करणे शक्य नाही. त्यामुळे संकट ओढवले आहे. कंपनीने नुकसानीचा पंचनामा करून प्रभावित शेतकऱ्याला न्याय द्यावा.-प्रेमदास कांबळे, अध्यक्ष सेवा सहकारी संस्था लोहारा/नरव्हा.
उभ्या धानाला अंकुरल्या लोंबी
By admin | Published: October 05, 2016 12:39 AM