लोकमत न्यूज नेटवर्कशहापूर/जवाहरनगर : समोर धावणाऱ्या भरधाव कंटेनरने अचानक ब्रेक मारल्याने त्यावर एसटी बस आदळून झालेल्या अपघातात १८ प्रवासी जखमी झाल्याची घटना राष्ट्रीय महामार्गावरील शहापूर उड्डाणपूलावर बुधवारी दुपारी १.३० वाजताच्या सुमारास घडली. अपघात एवढा भीषण होता की एसटी बसच्या समोरील भागाचा पूर्णत: चुराडा झाला. सुदैवाने यात कुणाचा प्राण गेला नाही आणि बहुतांश प्रवाशी किरकोळ जखमी झाले. जखमींना तात्काळ जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले असून सायंकाळी १३ किरकोळ जखमींना सुटी देण्यात आली होती. सध्या पाच जणांवर उपचार सुरू आहे. साकोली आगाराची नागपूर-गोंदिया (एमएच ४० एन ८६०३) ही विठाई बस नागपुरवरून भंडाऱ्याकडे जात होती. ऑटोरिक्षा भरून असलेला एक कंटेनर या बसच्या समोर धावत होता. शहापूर येथील उड्डाणपूलावर अचानक कंटेनर चालकाने ब्रेक मारले आणि मागून भरधाव असलेली एसटी बस कंटेनरवर जावून आदळली. काय झाले कळायच्या आतच बसमध्ये एकच हलकल्लोळ उडाला. शहापूर येथील नागरिकांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत जखमींना भंडाराच्या जिल्हा रुग्णालयात दाखल केले. त्याठिकाणी १८ प्रवाशांपैकी १३ प्रवाशांना किरकोळ दु:खापत असल्याने सायंकाळी सुटी देण्यात आली. सध्या पाच जखमी उपचार घेत असून त्यात दोन महिलांची प्रकृती गंभीर असल्याचे सांगण्यात आले. ही बस चालक नरेश मोजे चालवित होता तर वाहक गोपाल राठोड होता. हे दोघेही या अपघातात किरकोळ जखमी झाले. घटनास्थळावर एसटी बसची अवस्था पाहून भीषण अपघात झाल्याचे भासत होते. सुदैवाने या अपघातात कोणाचाही प्राण गेला नाही. जवाहरनगर पोलीस ठाण्यात याप्रकरणी नोंद घेण्यात आली. एसटी बसचे अडीच लाख रुपयांचे नुकसान झाल्याचे सांगण्यात आले. या अपघाताची माहिती राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे अध्यक्ष यशवंत सोनकुसरे यांनी मिळाली. त्यांनी लगेच जिल्हा शल्यचिकीत्सक डॉ. फारूख रिजवी यांना ही माहिती दिली. त्यांनी तात्काळ सर्व डॉक्टरांना उपचारासाठी तात्काळ बोलावून घेतले. सुरूवातीला हा अपघात भीषण असल्याचे सांगण्यात येत होते. त्यामुळे सर्व डॉक्टरांना रुग्णालयात पाचारण करण्यात आले होते.
एसटीची जखमींना मदत एसटी बसला अपघात झाल्याचे माहित होताच विभागीय नियंत्रणक विनय गव्हाळे, विभागीय वाहतूक अधिकारी डॉ. चंद्रकांत वळसकर, मुख्ययंत्र अभियंता गजानन नागुलवार, भंडारा आगार प्रमुख फाल्गुन राखडे, बसस्थानक प्रमुख सारीका निमजे यांनी घटनास्थळी व त्यानंतर रुग्णालयात धाव घेतली. एसटीच्यावतीने किरकोळ जखमींना ५०० रुपये तर इतर जखमींना एक हजार रुपये तात्काळ देण्यात आली.
अपघातातील जखमी
सुखचरण नत्थूलाल रामटेके (५०), सवीता सुखराम रामटेके (४५) रा. जोधीटोला जि.बालाघाट, विजय दिवाकर लोखंडे (४५), जयश्री विजय लोखंडे (३०) रा. खमारी जि. गोंदिया, प्यारेलाल जोशी (७२) रा. पळसगाव जि. गोंदिया, नरेंद्र नेतराम फाये (३४) रा. गोंदिया, सावित्री राजेश मरकाम (२०) रा. किरणापूर जि. बालाघाट, राजेश भीकू मरकाम (२५) रा. किरणापूर जि. बालाघाट, रवी श्यामलाल सोनवाने (३२), मीना रवी सोनवाने (२९) रा. भुजाडोंगरी जि. बालाघाट, विशाखा विजय राघोर्ते (२०) रा. सालेबर्डी ता. भंडारा, शबाना अलताब कुरैशी (३८), अतीम अल्ताब कुरैशी रा. भंडारा, अपुर्वा मोरेश्वर सेलोकर (२१) रा. भंडारा, ज्ञानीराम जीवतू जनबंधू (७३) रा. मांगली ता. लाखनी, सुखदेव राजू दिघाडे रा. कोंढी जवाहरनगर, दिव्या बेलेंद्र निंबार्ते रा. भंडारा, शुभांगी रमेश रामटेके (३५) रा. सावरी जवाहरनगर, तनवीर सैयद रा. पळसगाव जि. गोंदिया अशी या अपघातात जखमी झालेल्यांची नावे आहेत.