संतोष जाधवरलाेकमत न्यूज नेटवर्क भंडारा : प्रवाशांच्या सेवेसाठी एसटी महामंडळातर्फे दरवर्षी मोठ्या प्रमाणात वाहन चालकांची भरती करण्यात येते. दरवर्षीच एसटी महामंडळात अनेक कर्मचारी सेवानिवृत्त होतात. तेवढेच कर्मचारी नव्याने भरती केले जातात. मात्र, गतवर्षी आलेल्या कोरोना संसर्गामुळे एसटीची चाके पहिल्यांदाच थांबली आणि त्यामुळे भरती केलेल्या कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षणही थांबले. काही जणांची नियुक्तीही रखडली आहे. परिवहन महामंडळातर्फे २०१९-२० मध्ये चालक कम वाहक भरती प्रक्रिया राबविण्यात आली होती. यामध्ये ४०७ वाहनचालकांची भरती जाहिरात निघाली होती. यामध्ये २३६ जण अंतिम निवड यादीमध्ये पात्र झाले होते. त्यातील २२७ चालक मेडिकल चाचणीस पात्र झाले. त्यातील ७२ जणांची चालक तथा वाहकपदी नेमणूक झाली, तर १०५ चालकांचे अठ्ठेचाळीस दिवसांचे प्रशिक्षण पूर्ण झाले आहे. तर अद्याप ५० वाहनचालकांचे ८० दिवसांचे प्रशिक्षण अद्याप बाकी आहे. मात्र, अद्याप काही जणांना अंतिम वाहन चालन चाचणीचा निकाल लागला नसल्याने नियुक्ती देता आलेली नाही.
एसटी वाढविणार उत्पन्नाचे विविध साेर्सेस
कोरोनाचा संसर्ग वाढताच एसटी महामंडळाने संपूर्ण वाहतूक बंद ठेवली होती. सहा ते सात महिने एसटीच्या फेऱ्या बंद असल्याने महामंडळाचे उत्पन्नही घटले होते. त्यामुळे सद्य: स्थितीत डिझेल, कर्मचाऱ्यांचा पगार, कार्यालयीन खर्चासोबतच अनावश्यक होणारा खर्च कसा टाळता येईल या बाबींवर एसटी महामंडळाने लक्ष केंद्रित केले असून, नवनवीन उत्पन्नाची साधने वाढविण्यासाठी महामंडळ आता प्रयत्न करणार आहे. एसटी महामंडळाने बदलत्या काळानुसार अनेक निर्णय घेतले आहेत. यामध्ये विविध शहरात मध्यवर्ती ठिकाणी असणाऱ्या जागांवरती नवनवीन प्रकल्प राबवून तसेच शासकीय वाहनांची दुरुस्ती, स्वत:चे एसटीचे पेट्राेलपंप यातून उत्पन्न कसे वाढेल याकडे लक्ष केंद्रीत केले आहे.
प्रशिक्षणार्थी चालक म्हणतात...
एसटीचे ४८ दिवसांचे प्रशिक्षण पूर्ण झाले. मात्र, अद्यापही ऐंशी दिवसांचे प्रशिक्षण माझे झालेले नाही. त्यातच लॉकडाऊन सुरू झाला. त्यामुळे प्रशिक्षण थांबले होते. आता पुढील प्रक्रिया कधी होणार याकडेच माझे लक्ष लागून आहे. कारण मी माझी खासगी नोकरी सोडली आहे.प्रशिक्षणार्थी, चालक.
राज्य परिवहन महामंडळाने आमचे प्रशिक्षण कोरोनामुळे थांबविले होते.त्यामुळे आम्ही सध्या घरीच बसून आहोत. मात्र, आता कोरोना नियम शिथिल होत असून प्रशिक्षणावरील स्थगिती उठून पुन्हा लवकरच सेवेत रुजू होण्याची संधी मिळेल, अशी मला आशा आहे. प्रशिक्षणार्थी, चालक.
कोरोनामुळे एसटीच्या फेऱ्या जशा बंद झाल्या होत्या तसेच चालक - वाहकांच्या प्रशिक्षणालाही स्थगिती महामंडळाने दिली होती. मात्र, आता नुकतेच वरिष्ठ कार्यालयाकडून प्रशिक्षणार्थी चालक सेवा, तसेच प्रशिक्षणे पूर्ववत करण्याचे आदेश दिल्याने तत्काळ या उमेदवारांना वरिष्ठांच्या सूचनेनुसार प्रशिक्षणासह सेवेत सामावून घेण्यात येईल. काेराेनामुळे ही प्रक्रीया संपूर्ण राज्यभरच थांबली हाेती. त्यानंतर वेळाेवेळी मिळालेल्या शासकीय निर्देशानुसार व वरिष्ठांच्या सल्ल्यानुसार लवकरच प्रशिक्षणार्थींचा विषय मार्गी लागेल.- डॉ. चंद्रकांत वडस्कर, विभागीय वाहतूक अधिकारी,भंडारा