भंडारा : कोरोना संसर्गाचा परिणाम एसटी महामंडळावर झाला असून राज्य परिवहन महामंडळाच्या बस अनेक दिवसांपासून जागेवरच उभ्या आहेत. राज्य शासनाने एसटी बसला अत्यावश्यक सेवेत गणले असले तरीही प्रवाशांचा मिळत असलेला अत्यल्प प्रतिसाद व वाढत असलेल्या कोरोना संसर्गामुळे एसटीचे उत्पन्न घटले आहे. मात्र, दुसरीकडे दर महिन्याला चार कोटी रुपये पगारापोटी भंडारा विभागात खर्च होत आहेत. मात्र, त्यातुलनेत मालवाहू वाहतूक व अल्प प्रमाणात सुरू असलेली प्रवासी वाहतुकीतून उत्पन्न मात्र महिन्याकाठी ४५ हजार इतकेच मिळत आहे. इतर खर्चासाठी पैसे लागत असल्याने एसटीचा तोटा अधिकच वाढत चालला आहे. कोरोनापूर्वी एसटी महामंडळाला प्रत्येक आगारात असणारे चहाचे स्टॉल, फ्रूट स्टॉल, पेपर, पुस्तके दुकाने व अन्य मार्गातून भाड्याच्या स्वरूपात काही प्रमाणात उत्पन्न मिळत होते. मात्र, आता ही दुकानेही बंद असल्याने त्याचाही फटका एसटी महामंडळाला सहन करावा लागत आहे.
बॉक्स
शासनाने मदत न केल्यास पगार होणे अवघड होईल
राज्य शासनाने एसटी महामंडळाला एक हजार कोटींची मदत केल्याची माहिती आहे. त्यामुळे सध्यातरी एसटी कर्मचाऱ्यांचे पगार नियमित होत असले तरी भविष्यात मात्र उत्पन्न घटल्यामुळे पगार नियमित होतीलच याची शाश्वती कमी आहे. कोरोना संकटात एसटी चालकांनी व इतर कर्मचाऱ्यांनी आपला जीव धोक्यात घालून सेवा निभावली असल्याने शासनानेही महामंडळासाठी यापुढेही विशेष तरतूद करावी, अशी मागणी आहे.
कोट
संचारबंदीमुळे एसटीच्या प्रवासी बसफेऱ्या बंद होत्या. त्यामुळे आता लगेच प्रवासी मिळणे कठीण झाले आहे. सध्या पगार नियमित मिळत आहे. मात्र, उत्पन्न असेच घटल्यास पगाराचा प्रश्न गंभीर होऊ शकतो.
एसटी, कर्मचारी
कोट
सध्या सर्वच एसटी कर्मचाऱ्यांचा पगार कोरोनातही नियमित होत आहे. ही अत्यंत आनंदाची गोष्ट आहे. मात्र, कोरोनामुळे एसटीची परिस्थिती अशीच राहिली तर भविष्यात कर्मचाऱ्यांना समस्या येऊ शकतात.
एसटी, कर्मचारी
कोट
राज्य शासनाने एसटी बसला अत्यावश्यक सेवेसाठी घोषित केले. सध्या आम्ही मालवाहतुकीतूनही उत्पन्न मिळवत आहोत. मात्र, प्रवासी वाहतुकीची सर येऊ शकत नाही. कोरोनामुळे पूर्वीच्या तुलनेत एसटीचे उत्पन्न खालावले आहे. मात्र, असे असले तरी एसटी महामंडळ भंडारा विभागातर्फे उत्पन्नवाढीसाठी नवनवीन प्रयोग सुरू केले आहेत.
डॉ. चंद्रकांत वडस्कर, विभागीय वाहतूक अधिकारी, भंडारा.
बॉक्स
प्रवासी काय म्हणतात
कोरोना संसर्गाचा प्रादुर्भाव असला तरीही शासनाने खासगी वाहने सुरूच ठेवली आहेत. त्याप्रमाणे एसटीच्या फेऱ्या कमी का असेना मात्र सुरू ठेवाव्यात. त्यामुळे प्रवाशांची गैरसोय टळू शकेल व एसटी महामंडळाचे उत्पन्न वाढण्यास मदत मिळेल.
आजही अनेक प्रवासी एसटीची आतुरतेने वाट पाहतात. शासनाने प्रवासी आणि एसटी महामंडळ या दोघांच्या सोयीसाठी पुढाकार घ्यावा, अशी प्रवाशांची मागणी आहे.