संतोष जाधवरलाेकमत न्यूज नेटवर्कभंडारा : एसटी कर्मचाऱ्यांच्या संपामुळे ७५ दिवसांपासून बंद असलेली एसटी बससेवा हळुहळू पूर्वपदावर येत असून, बुधवारी ५७ बसच्या ९६ फेऱ्या झाल्या. सुमारे दोन हजार प्रवाशांनी प्रवास केला. कमी प्रमाणात का असेना बससेवा सुरू झाल्याने प्रवाशांना दिलासा मिळत आहे.एसटी महामंडळाचे राज्य शासनात विलीनीकरण करावे, या मागणीसाठी तब्बल ७५ दिवसांपासून एसटी कर्मचारी संपावर आहेत. एसटीच्या इतिहासातील हा दीर्घकाळ चाललेला संप ठरला आहे. या संपामुळे शहरी आणि ग्रामीण बससेवा ठप्प झाली होती. मात्र, गत १५ दिवसांपासून तुरळक प्रमाणात बससेवा सुरू करण्यात महामंडळाला यश आले आहे. दोन दिवसांपासून तर ५७ बस रस्त्यावर धावत आहेत. भंडारा, नागपूर, गोंदिया, तिरोडा, तुमसर या मार्गावर या बस धावत आहेत. प्रवाशांचाही बसला चांगला प्रतिसाद मिळत आहे. भंडारा, नागपूर बसमध्ये तर पाय ठेवायलाही जागा नसते. मंगळवारी १४ बसच्या नागपूरसाठी ३९ फेऱ्या करण्यात आल्या. ६१५ प्रवाशांनी प्रवास केला. तर बुधवारी सकाळी ६ ते दुपारी १० वाजेपर्यंत ४७ बसच्या ६१ फेऱ्या झाल्या. त्यात १०९५ प्रवाशांनी प्रवास केला.एसटी बससेवा हळुहळू पूर्वपदावर येत असून लवकरच पूर्ण क्षमतेने बसेस रस्त्यावर धावतील अशी अपेक्षा आहे.
२७६ कर्मचारी निलंबित, १५७ जणांना नोटीस- वारंवार विनंती करूनही कामावर रुजू न होणाऱ्या कर्मचाऱ्यांविरुद्ध एसटी महामंडळाने आक्रमक पवित्रा घेतला आहे. भंडारा विभागातील सहा आगारांतील २७६ कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आले. तर, ८६ कर्मचाऱ्यांची सेवा समाप्ती केली. ८४ कर्मचाऱ्यांच्या प्रशासकीय बदल्या करण्यात आल्या. तर बडतर्फीसाठी १५७ कर्मचाऱ्यांना नोटीस बजावण्यात आली आहे. ५० कर्मचारी बडतर्फही करण्यात आले आहेत.
७७ कर्मचारी झाले रुजू- संपानंतर एसटी महामंडळाचे ७७ कर्मचारी रुजू झाले. त्यात चालक २१, वाहक २५, चालक कम वाहक एक, यांत्रिक विभागातील १६, वाहतूक नियंत्रक ४ आदी कर्मचाऱ्यांचा समावेश आहे.
भंडारा विभागात एसटी बसच्या फेऱ्या वाढल्या आहेत. ११ जानेवारीपर्यंत ७७ कर्मचारी कामावर रुजू झाले आहेत. ५७ बस सुरू आहेत. प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी विभागीय स्तरावर सर्वतोपरी प्रयत्न केले जात आहेत.-महेंद्र नेवारे, विभाग नियंत्रक, भंडारा.