इंद्रपाल कटकवारलोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : तीन दिवसांपासून ग्रामीण क्षेत्रातील पाचवी ते बारावीच्या शाळा सुरू झाल्या आहेत. मात्र १५ दिवसांपासून एसटीचासंप सुरू असून मानव विकासच्या बसमधून शाळेत जाणाऱ्या विद्यार्थ्यांची मोठी गोची झाली आहे. बसच गावापर्यंत जात नसल्याने गुरूजी आम्ही शाळेत येवू तरी कसे, असा प्रश्न विद्यार्थी विचारीत आहेत.राज्य परिवहन महामंडळाच्या भंडारा विभागांतर्गत सर्वच तालुक्यात मानव विकास मिशनच्या बसेस धावत असतात. मात्र संपामुळे या सर्व बसेस बंद असल्याने विद्यार्थ्यांना शाळेत जाणे जीकरिचे होत आहे. मिळेल त्या साधनाने विद्यार्थी जात असले तरी शाळेत विद्यार्थ्यांची संख्या चांगलीच रोडवल्याचे दिसून येते. ग्रामीण भागातील विद्यार्थी बसअभावी शिक्षणापासून वंचित राहत असल्याचे चित्र असून या शैक्षणिक खोळंब्याला जबाबदार कोण, असा सवालही उपस्थित केला जात आहे. सध्या तरी संप मिटण्याची प्रतीक्षा विद्यार्थ्यांना करावी लागणार आहे.
रोज दुप्पट भाडे कसे परवडणार?
खाजगी बससेवेचा आधार घेवून मी शाळेत जात आहे. मात्र त्यासाठी दुप्पट भाडे द्यावे लागत आहे. १२ रुपयाची तिकीट आता थेट २२ रुपयाला पडत असल्याने रोज दहा रुपये अतिरिक्त देणे परवडण्यासारखे नाही. -एक विद्यार्थी.
मानव विकासच्या बसमधून मी शाळेत जात होतो. आता ऑटो रिक्षाच्या सहायाने शाळेत जात आहे. तीन दिवसांपासून जवळपास ५० रुपये अधिकचे भाड्यापोटी मोजले आहे, असे किती दिवस चालायचे. -एक विद्यार्थी.